मुंबई : मुंबईमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच गेल्या २४ तासांत मुंबईमध्ये ११९९ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १७८ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५६४७ वर पोहचला आहे.
मुंबईमध्ये शनिवारी ११९९ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४० जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४० पुरुष तर २५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ४ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ४२ जण हे ६० वर्षांवरील, तर १९ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.
मुंबईत कोरोनाचे ९४६ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ६९ हजार ३०८ वर पोहचली आहे. तसेच ११५२ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ७० हजार ४९२ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.