ठाकरे बंधूंची आघाडीमधील वादावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंमधील युतीवर भाष्य केले. यावरुन दोन्ही बंधूंमध्ये निवडणुकीनंतर वादाची ठिणगी पडल्याचे दिसून आले. खासदार राऊत म्हणाले की, “महापालिकेचे राजकारण हे वेगळे असते आणि आमचे पक्षाचे काम वेगळे आहे. मी वैयक्तिकरित्या कधीही महापालिकेच्या राजकारणात किंवा या नियुक्तीच्या प्रक्रियेत पडलेलो नाही. महापालिकेत काय चालते हे सर्वांना माहित आहे, त्यामुळे आम्ही त्या तलावाच्या बाहेर राहणे पसंत करतो. मात्र, मनसे आणि आमची युती आजही टिकून आहे. या विषयावर अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेतृत्व घेईल,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
हे देखील वाचा : आता… ‘ गाव तिथे एसटी ’ नव्हे… ‘आदिवासी पाडा, तिथे एसटी ’! मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
पुढे ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेत तीन स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित करण्यात आली आहे. ही नावे प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहेत.” सूत्रांच्या माहितीनुसार, या जागांचे वाटप करताना मनसेला विश्वासात घेतले गेले नसल्याची प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली आहे. युती धर्म पाळून या ३ पैकी एक जागा मनसेच्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली होती. मात्र, ठाकरे गटाने आपल्याच नेत्यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मनसेकडून कोत्या मनोवृत्तीची माणसं अशा शब्दांत टीका करण्यात आली आहे. यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन
याचबरोबर काही दिवसांपूर्वी मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील राजकारणामध्ये काहीही कायमस्वरुपी काहीही नसतं या आशयाची टीका केली होती. राज ठाकरे म्हणाले होते की, आजची महाराष्ट्रातील जी सर्व परिस्थिती आहे. महाराष्ट्र हा सध्या आता आयसीयूमध्ये आहे. सध्या जी काही परिस्थिती आहे, त्याला आपण बाळसं म्हणू शकत नाही. त्याला आपण सूज म्हणू शकतो. ही इतकी विचित्र घाणेरडी सूज आहे की ज्यात अनेकांना असं वाटतं की जे काही सुरु आहे हे कायमस्वरुपी आहे. कायमस्वरुपी काहीही नसतं, असे सूचक वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनामध्ये नक्की काय सुरु आहे याची चर्चा सुरु झाली.






