राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार आणि ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीतील प्रभागांची नव्याने आखणी करणे आवश्यक असते. लोकसंख्येतील बदल, नव्याने निर्माण झालेली वसाहत, तसेच भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन प्रभागांची रचना केली जाते. यामुळे प्रतिनिधित्वामध्ये समतोल राखला जाऊन लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम होते, असा उद्देश या प्रभाग रचनेमागे असतो.
प्रत्येक ग्रामपंचायतीची अद्ययावत लोकसंख्या आकडेवारीचा आधार घेतला जातो. प्रभाग रचनेत भौगोलिक सलगता व नैसर्गिक सीमांचा विचार करावा लागतो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व महिला आरक्षणाबाबत शासनाच्या धोरणांचे पालन करावे. कोणत्याही गावात अन्यायकारक किंवा पक्षपाती पद्धतीने प्रभाग आखणी होणार नाही याची दक्षता घ्यावी. निश्चित कालमर्यादेत प्रारूप प्रस्ताव तयार करून सादर करावेत.बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच प्रभाग रचना करताना उद्भवणाऱ्या तांत्रिक व कायदेशीर अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार उपस्थित होते. त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव ठेवून पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. ज्या ६५ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना होणार आहे, त्या ग्रामपंचायतींची यादी प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रारूप प्रसिद्ध करून हरकती व सूचनांसाठी मुदत देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे संबंधित नागरिकांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे.






