Jai Jai Swami Samarth Marathi Serial: बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा!
बाळाची तब्येत आणि त्याची काळजी घेण्यासाठी शिवनाथ आणि राधा रात्री बराच वेळ जागे असतात. थकवा इतका वाढतो की शेवटी दोघांनाही झोप लागते. सकाळी डोळे उघडल्यानंतर मात्र त्यांना बाळ कुठेच दिसत नाही. घरात शोधाशोध सुरू होते. दार बंद होतं, खिडक्याही बंद होत्या. मग बाळ घरातून बाहेर गेलं तरी कसं?
घाबरलेले आई-वडील आजूबाजूचा परिसर शोधायला सुरुवात करतात. गावातही बाळाचा शोध घेतला जातो. प्रत्येक ठिकाणी चौकशी करूनही काहीच माहिती मिळत नाही. वेळ जातो तशी राधाची चिंता वाढत जाते. आपल्या लेकराचं काय झालं असेल, या विचाराने तिची अवस्था बिकट होते. याचवेळी या रहस्याला एक वेगळं वळण मिळतं. मार्तंडच्या मनात एक धक्कादायक विचार येतो.
बाळाला स्वामी समर्थांनी आपल्याजवळ नेलं असेल का? कारण बाळाच्या बारशाच्या वेळी स्वामींनी केलेलं एक वक्तव्य त्याला आठवतं. बाळ त्यांच्याकडे सोपवलं नाही, तर ते स्वतःच्या मार्गाने त्याला घेऊन जातील, असा इशारा स्वामींनी त्यावेळी दिला होता.Jai Jai Swami Samarth Marathi Serial:
हा विचार मनात येताच शिवनाथ आणि राधा थेट स्वामींच्या स्थानाकडे धाव घेतात. आपल्या बाळाचा शोध तिथे लागेल, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र तिथे पोहोचल्यानंतर त्यांना स्वामी दिसत नाहीत. त्यामुळे राधाचा संशय आणखी गडद होतो. तिच्या मनात एकच प्रश्न असतो. आपलं बाळ खरंच स्वामी घेऊन गेले आहेत का?
पण कथा इथेच संपत नाही. दुसरीकडे जे दृश्य पाहायला मिळतं, ते या संपूर्ण प्रकरणाचं गूढ आणखी वाढवतं. स्वामींच्या मांडीवर शिवनाथ आणि राधाचं बाळ निवांत खेळत असतं. बाळाच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नसते. उलट ते अगदी आनंदात दिसतं. बाळाला जवळ घेत स्वामी काही गूढ शब्द बोलतात. त्यांचा अर्थ सहज समजत नाही. बाळाच्या आयुष्यात त्याला मिळणाऱ्या प्रेमाबाबत स्वामी एक आश्वासन देतात. त्यांच्या बोलण्यातून असं जाणवतं की या छोट्या जीवाच्या भवितव्याशी संबंधित काहीतरी मोठं सत्य त्यांना माहीत आहे.
शिवनाथ आणि राधा जेव्हा आपल्या बाळाला स्वामींकडे पाहतात, तेव्हा त्यांचा संयम सुटतो. आपल्या लेकराला आपल्यापासून दूर का ठेवलं, याचा जाब ते विचारतात. मात्र स्वामींचं उत्तर दोघांनाही हादरवून टाकतं. हे मूल केवळ त्यांचं नाही, तर त्यांच्याशीही त्याचा विशेष संबंध असल्याचं स्वामी सांगतात. स्वामींच्या या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात. एका आई-वडिलांसमोर त्यांचं स्वतःचं बाळ असूनही त्यावर आपला अधिक अधिकार असल्याचा दावा स्वामी का करत आहेत? या मुलाच्या जन्मामागे काही जुनी गोष्ट दडलेली आहे का? त्याच्या आयुष्यात पुढे काही मोठं घडणार आहे का?
मार्तंडलाही आता स्वामींच्या वागण्यात काहीतरी वेगळं जाणवतं. त्यांची प्रत्येक कृती विचारपूर्वक असल्याचं त्याला जाणवतं. त्यामुळे हे फक्त बाळाला घेऊन जाण्याचं प्रकरण नसून त्यामागे मोठं कारण असावं, अशी शंका निर्माण झाली आहे.आता शिवनाथ आणि राधाला आपल्या बाळाबद्दल कोणतं सत्य समजणार, स्वामी त्याला स्वतःजवळ का ठेवत आहेत आणि त्यांच्या ‘अधिक अधिकार’ या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘मराठी’चा डिजिटल दबदबा वाढणार! ZEE5 च्या नव्या कंटेंटमध्ये कथा, वैविध्य आणि भरपूर मनोरंजन
बाळाच्या आयुष्याशी जोडलेलं गुपित उलगडल्यानंतर कथेला आणखी मोठं वळण मिळण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा पुढचा भाग पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे. दररोज रात्री ८.१० वाजता कलर्स मराठीवर ही मालिका पाहता येणार आहे.

