सौजन्य - नवराष्ट्र टीम
चाकण : कोरेगाव फाटा ते बिरदवडी–आंबेठाण या प्रमुख मार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यायी ग्रामीण रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी बोरदरा, वराळे, गोणवडी आणि बिरदवडी परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था गंभीर झाली असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर बोरदरा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन बोरदरा–वराळे–गोणवडी–बिरदवडी या पर्यायी मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
कोरेगाव फाटा ते बिरदवडी–आंबेठाण या मुख्य मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना बराच वेळ रस्त्यावर अडकून राहावे लागते. त्यामुळे वेळेची नासाडी होत असून प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे
वाढत्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था
मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालक वराळे, बोरदरा, गोणवडी आणि बिरदवडी या ग्रामीण मार्गांचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करीत आहेत. मात्र, या रस्त्यांची रचना आणि क्षमता पूर्वीच्या मर्यादित वाहतुकीनुसार असल्याने अचानक वाढलेल्या वाहनांच्या संख्येचा मोठा ताण या मार्गांवर पडत आहे. परिणामी रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. खराब रस्ता आणि वाढती वाहतूक यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच रोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा फटका बसत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवासासाठी अधिक वेळ लागत आहे.
रस्त्याची क्षमता, देखभालीकडे दुर्लक्ष
“मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे आमच्या गावातून मोठ्या प्रमाणात वाहतूक वळविली जात आहे. मात्र, वाढलेल्या वाहतुकीच्या तुलनेत या रस्त्याची क्षमता आणि देखभाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो वाहतुकीस सुरक्षित करावा,” अशी मागणी बोरदरा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन रस्त्याची सद्यस्थिती, वाढलेली वाहतूक आणि स्थानिक नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांची सविस्तर माहिती दिली. संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

