येवला तालुक्यात एकूण ८८ तर येवला शहरात ५४ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाचा हा वेग अधिक वाढविण्याबरोबर लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरण पूर्ण करण्यात यावे. विदेशातील वाढत्या लाटेच्या पार्श्वभुमीवर अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून सर्वप्रथम पहिल्या डोसचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, विदेशात पुन्हा कोरोनाची लाट वाढत आहे त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. साथरोग आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून नवीन कामे देखील सुरू करण्यात यावीत. विकास कामांना अधिक गती देण्यात यावी.
अतिवृष्टीसाठी येवल्यात ४३ तर निफाड तालुक्यात ३ कोटी मदत निधी प्राप्त झाला आहेत. दिपावलीच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नाशिक औरंगाबाद रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी अपघात होणार नाही यासाठी अधिक काळजी घेण्यात यावी. रस्त्याचे हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. रस्ते दुरुस्ती करतांना अपघात झाले तर निष्काळजी पणाचा ठपका ठेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
येवला तालुक्यातील खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत बँका यांचा एकूण लक्षांक एकूण ७५ कोटी होता. या हंगामात लक्षांकाचे उद्दिष्ट पूर्ण होऊन आतापर्यंत एकूण ८४ कोटी २८ लक्ष ३१ हजार इतके पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे सांगून यावेळी निफाड तालुक्यातील पीक कर्जाचा देखील आढावा पालकमंत्री भुजबळ यांनी घेतला.






