पिंपरी : अवैधरीत्या दारूचा साठा ( seized liquor ) आणि त्याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध सुरु असलेल्या मोहिमेतंर्गत पिंपरी-चिंचवड़ पोलिसांनी ( Pimpri-Chinchwad Police ) तीन ठिकाणी छापा टाकत ६ लाख ६४ हजारांचा दारूसाठा जप्त केला आहे. तीन प्रकरणात शनिवारी संबंधित पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एक हजार ६६४ रुपये, शिरगाव पोलिसांनी पाच लाख ५८ हजाराचे गुळ मिश्रीत दारू बनविण्याचे कच्चे रसायन आणि देहूरोड पोलिसांनी एक लाख ४ हजारांची हातभट्टीची दारू जप्त केली आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नितीन सीताराम तारडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक राठोड पूर्ण नाव पत्ता माहिती नाही. सध्या (रा. सुदवडी, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अभिषेककडून एक हजार ६६४ रुपये किमतीच्या टॅंगो पंच दारूच्या १२ बाटल्या आणि बॅगपेपर दारूच्या ८ बाटल्या जप्त केल्या आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
शिरगाव पोलिसांनी शिरगाव परिसरात पवना नदीच्या किनारी सुरु असलेल्या दारूभट्टीवर छापा मारला. त्यात पोलिसांनी पाच लाख ५८ हजारांचे गूळ मिश्रित दारू बनविण्याचे कच्चे रसायन जप्त केले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून गेले. याबाबत कुंदन प्रकाश नानावंत, अकबर गुलाबसिंग मन्नवत, अलका कुंदन नानावत, पूनम अकबर मन्नवत, मर्जिना हेमराज रजपूत, राहुल जीवन मन्नवत (सर्व रा. शिरगाव, कंजारभाट वस्ती, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी एक लाख ४ हजार ७५० रुपयांचा गावठी हातभट्टी दारूसाठा जप्त केला आहे. देविदास शंकर बिनावत (वय 20, रा. मामुर्डी) याच्या विरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किशोर विठ्ठल परदेशी यांनी फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.






