१२ वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या मंचावरून जगभरातील रसिकांना वेड लावणारे पंचरत्न परतणार असल्याचं आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे. पंचरत्नांमध्ये सर्वात लहान असलेली मुग्धा वैशंपायन आता जजच्या रूपात ‘सारेगमप’मध्ये दिसणार आहे. एक तपाच्या या काळामध्ये मुग्धानं बरंच काही आत्मसात केलं आहे. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच गायनातही ती पारंगत झाली आहे. गुरूंच्या सान्निध्यात मुग्धावर झालेले गायनाचे संस्कार आता नव्यानं रसिकांना अनुभवायला मिळणार आहेत. १२ वर्षांनंतर पुन्हा तिथेच पोहोचलेल्या प्रवासादरम्यानच्या आठवणी मुग्धानं ‘नवराष्ट्र’सोबत शेअर केल्या.
जाहिरातजाहिरातView this post on Instagram
A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)
मुग्धा आज जरी मोठी झाली असली तरी आजही गाणं गातानाचे हावभाव, माईकवर बोट वाजवण्याची सवय आणि एकूण गाण्यात अनोखे रंग भरण्याची शैली असलेली १२ वर्षांपूर्वीची चिमुरडी मुग्धाच डोळ्यांसमोर उभी राहते. मूळची अलिबागची असलेली मुग्धा दहावीपर्यंत तिथेच शिकली. रुपारेल कॅालेजमध्ये अकरावी सायन्सला अॅडमिशन मिळाल्यानं मुंबईत शिफ्ट झाली. सायन्स, प्रोग्राम्स आणि गाणं करणं जमलं नाही, तर आर्टसला शिफ्ट व्हायचं तिनं आधीच ठरवलं, पण अभ्यासातही हुषार असलेल्या मुग्धाला तसं करावं लागलं नाही. मॅथेमॅटिक्स आणि सायन्स आवडत असल्यानं तिनं बीएससी केलं. आता तिला म्युझिकमधून एमए करायचं आहे. तिनं क्लासिकलमध्ये विशारद केलं आहे. सीसीआरडी इंडियन क्लासिकल म्युझिकची स्कॅालरशीप मुग्धाला मिळाली आहे. षण्मुखानंद सभागृहातर्फे इंडियन क्लासिकल म्युझिकसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासोबत शाहू मोडक, कोकण रत्न, कोकण कन्या, रायगड भूषण, माणिक वर्मा अशा बऱ्याच पुरस्कारांवर मुग्धानं आपलं नाव कोरलं आहे. ‘उबंटू’, ‘ताऱ्यांचे बेट’ या चित्रपटांसोबतच ‘या गोल गोल डब्यातला’साठी तिनं अशोक सराफांसोबत गाणं गायलं आहे.
घरी गायनाची परंपरा नसूनही मुग्धानं बालवयात मिळवलेलं यश नेत्रदीपक आणि प्रेरणादायी आहे. याबाबत मुग्धा म्हणाली की, सध्या मी पंडीता शुभदा पराडकर यांच्याकडे गाणं शिकतेय. माझ्या घरी म्युझिकल बॅग्राऊंड नाही. बाबा रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये जॅाब करतात आणि आई गृहिणी आहे. बाबांच्या बाबांना म्हणजे माझ्या आजोबांना गाणी ऐकायला आवडायचं. त्या काळी रात्री रेडिओवर नाट्य संगीत किंवा क्लासिकल संगीत लागायचं ते आजोबा न चुकता ऐकायचे. बाबांनाही त्याची गोडी लागली. मी लहान असताना बाबाही गाणी लावायचे. त्यामुळे गाणं कानावर पडत गेलं. बाबांना तबला वाजवायला आवडत असल्यानं आम्ही अलिबागला शिफ्ट झाल्यावर त्यांना तबला शिकवायला गुरुजी यायचे. ते हार्मोनियमवर साथ करायचे, तेव्हा मी पूर्ण वेळ तिथेच असायचे. गुरुजी गेल्यावर हार्मोनियमवर हात पुरत नसूनही मी गाण्याचा प्रयत्न करायचे. त्यावेळी बाबांनी माझा गायनाचा कल ओळखला. मग कौटुंबिक कार्यक्रमामध्ये काहीतरी गाणं वगैरे म्हणायचे.
क्लासटीचरमुळे ‘सारेगमप’मध्ये आले
चौथी इयत्तेत शिकत असताना सारेगमपच्या आॅडीशन्स सुरू झाल्याचं टीव्हीवर दाखवलं गेलं. माझ्या क्लासटीचर हळदवणेकर यांनी याबाबत बाबांना सांगितलं. आपण मुग्धाला तिथे घेऊन जाऊया असं त्या म्हणाल्या, पण मुग्धा फार छोटी असून, ती गाणं शिकलेली नसल्यानं स्पर्धेत सहभागी होण्याइतकी छान गात नसल्याचं आई-बाबांना वाटत होतं. तिथे मुंबई-पुण्यातील मुलं असल्यानं मुग्धा नक्की एलिमीनेट होणार असं त्यांना वाटत होतं. यासाठी ते टाळत होते, पण क्लासटीचर खूपच मागे लागल्या होत्या. स्वत: मला घेऊन जायला तयार झाल्या. त्यामुळं आई-बाबांपुढे आॅप्शन नव्हता. मी एलिमिनेट होऊन एका दिवसात परतणार याची आई-बाबांना पक्की खात्री असल्यानं फक्त अंगावरच्या कपड्यांसह मुंबईला गेलो होतो. मुंबईत फायनल राऊंडसाठी मी सिलेक्ट झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातून सिलेक्ट झालेल्यांची फायनल आॅडीशन घेणार होते. त्यामुळं आम्ही आत्येकडे राहून त्याच कपड्यांवर दुसऱ्या दिवशी आॅडीशनला गेलो. त्यातही सिलेक्ट झाले. अपघातातून काही चांगल्या गोष्टीही घडतात आणि अशाप्रकारे माझी गायनाची जर्नी सुरू झाली.
तेव्हा काहीच समजत नव्हतं
मी खूप लहान असताना ‘सारेगमप’मध्ये यश मिळवल्यानं आपण खूप काही मोठं केलंय किंवा आपल्याला खूप प्रसिद्धी मिळतेय याबाबत मला काहीच कळत नव्हतं. माझा पहिला एपिसोड शूट झाल्यानंतर १५ दिवसांनी तो एपिसोड टेलिकास्ट झाला. सर्वांना खूप उत्सुकता होती. माझं गाणं पाहिल्यावर मी बाबांना विचारलं की, अच्छा आपण जे तिथे गेलो होतो ते इथे गाणं दिसण्यासाठी होतं का? इतकं ते निरागस होतं. त्यामुळं मी इतर लहान मुलांप्रमाणेच इनोसन्स होते. मुख्याध्यापकांना माझं खूप कौतुक होतं, पण माझ्यामुळे इतर मुलांना वाईट वाटू नये यासाठी त्यांनी मला सर्वांसारखीच वागणूक दिली. आई-बाबांनीही मला वेगळी वागणूक देऊ नका असं सर्वांना सांगितलं होतं. आपण काहीतरी अॅचिव्ह केलं आहे असं मला वाटू नये यासाठी खूप हेल्दी वातावरण ठेवण्यात आलं होतं.
पंचरत्न त्यांचे ताई-दादा असतील
आम्ही पंचरत्न या नावानं शंभरहून अधिक कार्यक्रम केल्यानं एकमेकांना चांगले ओळखतो. प्रत्येकाचं गाणं, जॅानर आम्हाला ठाऊक आहे. आमची छान मैत्री आहे. या पर्वाच्या निमित्तानं पूर्वी घडलेलं रिकॅाल होणार आहे. खूप मोठी जबाबदारी असल्यानं किंचित दडपण आहे. टीमवर्कमुळं दडपण जाईल आणि चांगलं काम होईल याची खात्री आहे. २००८-०९च्या पर्वात मी स्पर्धक होते. आता जज बनून येतेय. हा १२-१३ वर्षांचा प्रवास खूप कमालीचा असल्यानं खूप आनंद होतोय. आम्ही टेक्नोसॅव्ही नव्हतो. त्यामुळं एखादा कलाकार स्वत:ला कसा प्रेझेंट करू शकतो याबाबत काही ठाऊक नव्हतं. सारेगमपनंतर जे काही केलं ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हे आम्हाला समजत नव्हतं. आताची जनरेशन टेक्नोसॅव्ही आहे. त्यांना स्वत:ला प्रमोट कसं करायचं, कसं प्रेझेंट करायचं हे माहित आहे. हे करताना त्यांचा गाण्यावरचा फोकस कमी होता कामा नये याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. यासाठी त्यांना ग्रूम करण्याचा प्रयत्न करू. त्यांचे ताई-दादा बनून त्यांना समजावू. जज या भूमिकेत असलो, तरी ताई-दादाच्या नजरेतून आम्ही त्यांना जज करणार आहोत ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते.
अभिषेकीबुवांच्या गायनाचा पगडा
मला गाण्यांचे सर्व प्रकार आवडतात. भारताचं अभिजात संगीत असलेलं क्लासिकल आवडतं. लतादीदी, जितेंद्रबुवा अभिषेकी, भीमसेन जोशी माझे आदर्श आहेत. अभिषेकीबुवांची गाणी नेहमीच प्रेरणादायी वाटतात. कोकणचं वर्णन करणारं गाणं खूप छान आहे. याशिवाय त्यांचे अभिजात संगीतातील राग, भावगीतं व नाट्यगीतं मनाला भावतात. उल्हास कशाळकर, पं. शुभदा पराडकर हे देखील आदर्श आहेत. ‘सारेगमप’च्या नव्या पर्वाच्या निमित्तानं रसिकांना सांगायचंय की, १२ वर्षांपूर्वी स्पर्धक म्हणून आमच्यावर जेवढं प्रेम केलं, जेवढे आम्हाला आशीर्वाद दिले, तेवढेच आता जजच्या भूमिकेसाठी द्या ही खूप प्रेमाची विनंती आहे. या संपूर्ण पर्वावर, स्पर्धक आणि आमच्यावर प्रेम करा. स्पर्धकांना सांगेन की, प्रसिद्धी मिळेलच, पण गाणं महत्त्वाचं आहे. कलेविषयी प्रामाणिक असायला हवं. कलेबद्दल आयुष्यभर मनात आदर असायला हवा. याहीपेक्षा माणूस म्हणून आपलं वागणं कायम खूप छान असायला हवं.






