संग्रहित फोटो
सोलापूर : आरोग्य विभागामधील विविध रिक्त पदे (गट ड) भरती प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यामध्ये पार पडली. या परीक्षेच्या अनुषंगाने न्यासा या संस्थेस संपूर्ण व्यवस्था पाहण्यासाठी राज्य स्तरावरून नियुक्त करण्यात आले होते. आरोग्य विभागाचे अधिकारी त्यांना राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पूर्ण मदत करीत होते. एकूण २६ केंद्रांवर परीक्षेच्या अनुषंगाने तयारी करण्यात आली होती.
परीक्षेची वेळ दुपारी २ ते ४ अशी होती. एकूण १०,२०० परीक्षार्थी या परीक्षेसाठी पात्र होते. यापैकी ६९३९ इतके परीक्षार्थी परीक्षेस उपस्थित होते. यामध्ये ४१ दिव्यांग उमेदवारांचा समावेश होता. ३२६१ परीक्षार्थी या परीक्षेस अनुपस्थित होते. उपस्थितीचे हे प्रमाण ६८% इतके होते. या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका ट्रेझरी स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. सर्व केंद्रांवर हत्यारबंद पोलिस बंदोबस्तात स्वतंत्र वाहनाद्वारे सकाळी ११ वाजता प्रश्नपत्रिका पोहोच झाल्या. या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ शुटिंग करण्यात आले. परीक्षा केंद्रांच्या सर्व कामाकाजाचे देखील व्हिडिओ शुटिंग करण्याची व्यवस्था करण्यात होती. परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर, कोविड प्रोटोकॉलप्रमाणे आसन व्यवस्था आदी बाबींची व्यवस्था कार्यरत होती.
सर्व केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात होता व उत्तरपत्रिका सीलबंद करून परत पाठविण्यापर्यंत बंदोबस्त कार्यरत होता. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेदरम्यान आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी पूर्ण काळ पर्यवेक्षणासाठी उपस्थित होते.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडला नाही. तसेच परीक्षार्थींना कोणत्याही प्रकारचा त्रास, गैरसोयींचा सामना करावा लागला नाही. उमेदवारांना प्रवेश पत्र देणे, परीक्षार्थींना केंद्राविषयी मार्गदर्शन करणे आदी बाबींसाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आला होता.
या संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये प्रशिक्षण, शाळा, महाविद्यालय, पर्यवेक्षक यांची उपलब्धता करून शहरातील विविध प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली यशस्वीरित्या परीक्षेचे कामकाज पार पाडण्यात आले.