सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शुक्रवारी अतिशय वेगाने सांगली शहरात पुराचे पाणी शिरले असले तरी शनिवारी मात्र पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली असली तरी, शहरात पाणी संत गतीने शिरले त्यामुळे बचावकार्य करण्यास मदत झाली. दरम्यान, कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात देखील पावसाने उघडीप दिली. त्यामुळे कोयनेचे दरवाजे बारा फुटांवरून आठफुटांपर्यंत बंद केले. त्यामुळे विसर्ग ५० हजारांवरून ३७ हजार क्यूसेकवर आणला आहे. वारणेचाही विसर्ग पहिल्यापेक्षा कमी केला आहे.
शनिवारी दुपारी तीन वाजता ५१ फूट इतकी पाणी पातळी असताना पाठबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी निवेदन काढले व कृष्णा नदीची पाणी पातळी ५२ फुटांवर स्थिर होईल, असा अंदाज व्यक्त केला. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले आहे.
सांगलीत पातळी आयुर्विन पुलाजवळ ५१ फुटांवर गेली आहे. नदीकाठचा परिसर पाण्यात गेला असून, शहरातील मारुती रोड, टिळक चौकात पाणी आले आहे. पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. शहरातील शिवाजी मंडई, गवळी गल्ली, हरिपूर रोड वरील रामनगर, भारत नगर परिसर पाण्यात गेला.
हरीपुरतील संगमेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या कृष्णा, वारणा नदीच्या संगम परिसरात पाणी वाढले आहे. नदीकाठची उपनगरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाने शनिवारी सकाळपासून विश्रांती घेतली. त्यामुळे सांगलीकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. त्यामुळे पाण्यात गेलेल्या परिसरात बचावकार्य गतीने सुरू आहे. एनडीआरएफची तीन पथके पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.