
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हृदयविकार हा भारतातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. तो केवळ वृद्धांनाच नव्हे तर तरुणांनाही प्रभावित करतो. बैठी जीवनशैली , आहाराच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, लठ्ठपणा , मधुमेह, उच्च रक्तदाब आणि आनुवंशिकत्मुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. कोरोनरी आर्टरी डिसीज (धमन्यांमध्ये अडथळा), हृदयविकाराचा झटका, हृदय निकामी होणे आणि एरिथमिया (अनियमित हृदयाची गती) हे सर्वसामान्यपणे दिसणारे आजार आहेत. यामध्ये छातीत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, दम लागणे, थकवा येणे, हात, मान, जबडा किंवा पाठीत वेदना होणे, घाम येणे, मळमळणे आणि चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
अनेक लोक सुरुवातीची लक्षणे जसे की छातीत दुखणे किंवा दम लागणे याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे उपचारास विलंब होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हृदय निकामी होण्यासारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवतात. अनेकांना बायपास शस्त्रक्रियेची भीती वाटते. मात्र, या प्रगत उपचारांबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे, कारण यामुळे रुग्णांचे परिणाम सुधारतात आणि मृत्यूदर देखील कमी होतो.
बायपास शस्त्रक्रिया, ज्याला कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (CABG) असेही म्हणतात, ही जीव वाचवणारी प्रक्रिया आहे. यामध्ये बंद झालेल्या धमन्यांना वळसा घालून हृदयापर्यंत रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत केला जातो. गंभीर अडथळे असल्यास कार्डिएक सर्जन ही शस्त्रक्रिया सुचवतात आणि ती वारंवार होणारे हार्ट अटॅक टाळण्यास मदत करते.
आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरत आहे. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रुग्ण पुन्हा सहजपणे दैनंदिन जीवन जगू शकतो. योग्य काळजी, नियमित तपासणी आणि सक्रिय जीवनशैली राखल्यास रुग्ण १५ ते २० वर्षे अधिक निरोगी आयुष्य जगू शकतो.
कोरोनरी आर्टरी डिसीज असलेल्या आणि औषधोपचार किंवा स्टेंटिंगनंतरही आराम न मिळणाऱ्या रुग्णांना बायपास शस्त्रक्रिया सुचवली जाते. तसेच मधुमेह असलेल्या आणि वारंवार हृदयाशी संबंधित त्रास जाणवणाऱ्या रुग्णांसाठीही ही शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते.
प्रत्येकाने आपल्या हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यास तो टाळू नका. तज्ज्ञांशी चर्चा करून आपल्या शंकांचे निरसन करा. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी योग्य माहिती घेऊन आरोग्यदायी निर्णय घेतल्यास हृदयाचे नक्कीच संरक्षण करता येईल.