फोटो सौजन्य - Social Media
आजच्या हाय-टेक युगात मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेकांच्या हातातून मोबाईल खाली ठेवला जात नाही. सोशल मीडिया, रील्स, चॅटिंग आणि बातम्यांमुळे मोबाईलपासून काही मिनिटे दूर राहणेही कठीण झाले आहे. ही सवय इतकी वाढली आहे की अनेक जण टॉयलेटमध्ये जातानाही मोबाईल सोबत नेतात. मात्र, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हळूहळू घातक ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते, टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसून मोबाईल वापरणे पचनसंस्थेसाठी हानिकारक आहे. मोबाईल पाहत बसल्यामुळे गरजेपेक्षा जास्त वेळ टॉयलेट सीटवर जातो. त्यामुळे रेक्टमवर अतिरिक्त दबाव पडतो आणि मूळव्याध (पाइल्स) होण्याचा धोका वाढतो. तसेच बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, गॅस आणि अॅसिडिटीसारख्या तक्रारीही उद्भवू शकतात. याशिवाय, टॉयलेटमध्ये मोबाईल वापरण्याचा मांसपेशी आणि हाडांवरही वाईट परिणाम होतो. सतत मान खाली घालून स्क्रीनकडे पाहिल्यामुळे मान, खांदे आणि पाठीवर ताण येतो. यामुळे मानदुखी, खांदेदुखी आणि मणक्याशी संबंधित समस्या वाढू शकतात. आधीच कण्याच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी ही सवय तात्काळ सोडणे अत्यंत गरजेचे आहे.
मोबाईलचा अतिवापर सर्वाइकल स्पॉन्डिलायटिसचा धोका वाढवतो. टॉयलेटमध्ये एकाच स्थितीत बराच वेळ बसल्याने डोकं आणि मानेच्या वरच्या भागावर जास्त ताण पडतो. यामुळे तीव्र डोकेदुखी, मानेत जडपणा आणि कधी कधी चक्कर येण्याची समस्याही निर्माण होऊ शकते. आरोग्याबरोबरच स्वच्छतेच्या दृष्टीनेही टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणे चुकीचे आहे. टॉयलेटमधील जंतू मोबाईलवर सहज चिकटतात. हा मोबाईल नंतर तुम्ही चेहऱ्याजवळ, कानाला किंवा अन्न खाताना हातात घेतो, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. अनेक संशोधनांमध्ये मोबाईल फोनवर मोठ्या प्रमाणात हानिकारक जंतू आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.
मानसिकदृष्ट्याही ही सवय नुकसानकारक ठरू शकते. शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मेंदू आणि शरीरातील अवयवांमध्ये समन्वय आवश्यक असतो. मात्र, मेंदू मोबाईलमध्ये गुंतलेला असेल तर ही नैसर्गिक प्रक्रिया नीट पूर्ण होत नाही. परिणामी पोट पूर्ण साफ होत नाही आणि हळूहळू शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. म्हणूनच, टॉयलेटमध्ये मोबाईल वापरण्याची सवय वेळीच बदलणे गरजेचे आहे. टॉयलेटमध्ये कमी वेळ घालवणे, शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे हेच खरे स्मार्टपणाचे लक्षण आहे. आज नाही तर उद्या, पण ही सवय बदलल्यास तुमचे आरोग्य नक्कीच तुमचे आभार मानेल.






