फोटो सौजन्य - Social Media
मोबाईलचा वापर आज प्रत्येकाच्या जीवनाचा भाग झाला आहे. प्रत्येकजण त्याचा जास्त वेळ मोबाईलवर घालवत असतो. याने डोळ्यांचा त्रास तर वाढतोच त्याचबरोबर हात आणि हाताच्या बोटांनाही त्रास होतो. मात्र, सतत स्क्रीनकडे पाहत राहणे आणि मोबाईल हातात धरून टाईप करणे यामुळे हात, बोटं आणि मनगटात वेदना किंवा ताण जाणवू लागतो. डॉक्टर या समस्येला “टेक्स्टर्स थंब” किंवा “स्मार्टफोन फिंगर्स” म्हणतात. पण काळजी करू नका, काही सोप्या आणि प्रभावी व्यायामांच्या मदतीने तुम्ही या वेदनेपासून आराम मिळवू शकता आणि हातांचे आरोग्य टिकवू शकता.
मुठीला बंद-उघड करणे
हात सरळ करून हलक्या दाबाने मूठ आवळा, 5 ते 10 सेकंद थांबा आणि मग हळूहळू उघडा. उघडताना बोटं शक्य तितकी पसरवा. हा व्यायाम 10 ते 15 वेळा करा. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि बोटांची जकडण कमी होते.
अंगठ्याला स्ट्रेच करणे
हात सरळ करून अंगठा शक्य तितका बाहेरच्या बाजूला ताणा, मग हळूवारपणे तो लहान बोटाच्या दिशेने वाकवा. दुसऱ्या हाताने हलकासा दाब देऊन 10 सेकंद थांबा. हे दोन्ही हातांनी 3-4 वेळा करा. त्यामुळे अंगठ्याच्या स्नायूंना लवचिकता मिळते.
मनगट फिरवणे
हात पुढे करून मनगट घड्याळाच्या दिशेने 10 वेळा आणि उलट दिशेने 10 वेळा फिरवा. हा व्यायाम मनगटातील जकडण दूर करून ताकद वाढवतो.
बोटं पसरवणे
दोन्ही हात “नमस्कार”च्या स्थितीत ठेवा आणि बोटं एकमेकांपासून शक्य तितकी पसरवा. 5 सेकंद ताण ठेवा आणि मग सैल करा. हे 10 वेळा करा. त्यामुळे बोटांच्या दरम्यानच्या स्नायूंना आराम मिळतो.
प्रेयर स्ट्रेच
दोन्ही हात छातीसमोर नमस्काराच्या मुद्रेत ठेवा आणि हळूहळू खाली आणा, जोपर्यंत मनगटावर हलका ताण जाणवत नाही. ही स्थिती 15 सेकंद ठेवा.
हे व्यायाम दिवसातून 2-3 वेळा, विशेषतः मोबाईल वापरल्यानंतर करा. प्रत्येक 20-30 मिनिटांनी मोबाईलपासून छोटा ब्रेक घेऊन या स्ट्रेचचा सराव करा. यामुळे हात-पाय बिनदुखी आणि निरोगी राहतील.






