घरातील छोटी मोठी काम करताना थकल्यासारखे वाटते? मग शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा बदल
पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी उपाय?
पोटॅशियम वाढवण्यासाठी काय खावे?
पोटॅशियमच्या कमतरतेची लक्षणे?
कायमच आनंदी आणि दीर्घकाळ मजबूत राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. त्यातील अतिशय महत्वाचे पोषक घटक म्हणजे पोटॅशियम. पोटॅशियम शरीरातील पेशींचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आणि स्नायू, मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी फार महत्वाचे आहे. याशिवाय हृदयाच्या ठोक्यांचे संतुलन राखण्यासाठी शरीरात पोटॅशियम असणे फार गरजेचे आहे. पण जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे शरीराला हानी पोहचते. पोटॅशियमची पातळी कमी झाल्यानंतर त्याचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. वारंवार थकवा अशक्तपणा जाणवणे, कोणतेही छोटे मोठे काम करताना थकल्यासारखे वाटणे, अतिशय साधी काम केल्यानंतर सुद्धा थकल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. पण वेळीच उपचार केल्यास शरीरात पोटॅशियमची पातळी संतुलित राहण्यास मदत होईल. हृदयाचे ठोके अनियमित होणे, पायांमध्ये गोळे येणे, हात पाय थरथरणे, अचानक चक्कर येणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. शरीरात निर्माण झालेल्या पोटॅशियमच्या कमतरतेमुळे काहीवेळा बद्धकोष्ठता, मळमळ, उलटी किंवा भूक न लागणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. तर काहींच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणता बदल करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.
पोटॅशियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरावर गंभीर दुष्परिणाम दिसू लागतात. त्यातील अतिशय गंभीर आणि धोकादायक लक्षणे म्हणजे हृदयाचे ठोके अनियमित होऊन हृदयावर जास्तीचा तणाव निर्माण होणे. यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि चालणे, उभे राहणे किंवा दैनंदिन कामे करताना असंख्य अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या शरीरात हृद्यासंबंधित लक्षणे दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे पचनसंस्था बिघडते, तर दीर्घकाळ शरीराला आवश्यक प्रमाणात पोटॅशियम नाही मिळाल्यास किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दैनंदिन आहारात बदल करून पोटॅशियम असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
दैनंदिन आहारात पोटॅशियम असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आहारात नारळपाणी, दही, दूध, डाळी, पालक, बीट, बटाटा, रताळी, संत्री, मोसंबी, डाळिंब आणि आंबा इत्यादी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात नियमित २ केळी खाल्ल्यास शरीराला आवश्यक प्रमाणात पोटॅशियम मिळेल. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पाण्याचे सेवन करावे. शरीराला अवश्यक असलेले प्रमाणात पाणी प्यायल्यास डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही. अनेक पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. अतिगोळ्या खाल्ल्यामुळे अतिसार, उलट्या होऊन शरीरातील पोटॅशियम आणि आवश्यक घटक झपाट्याने कमी होऊ शकतात.






