
केस खूप जास्त कोरडे आणि पातळ झाले आहेत? वाढत्या उन्हाळ्यात घरीच तयार करा नॅचरल हेअर मास्क, केसांची होईल वाढ
प्रत्येकाला आपले केस कायमच सुंदर आणि मजबूत हवे असतात. केसांच्या वाढीसाठी सतत काहींना काही केले जाते. कधी हेअर मास्क लावला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करून केसांची काळजी घेतली जाते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट केल्या जातात. वातावरणात होणारे बदल, आहारात होणारे बदल, मानसिक तणाव, जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. केसांमध्ये कोंडा, टाळूवरील इन्फेक्शन, केस तुटणे, केस गळणे इत्यादी अनेक केसांच्या समस्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)
वाढत्या उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे केस पूर्णपणे भिजून जातात आणि केस व्यवस्थित न सुकल्यामुळे केसांमध्ये कोंडा होऊन केस कोरडे आणि निस्तेज होतात. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला वाढत्या उन्हाळ्यात केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये नॅचरल हेअर मास्क बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नॅचरल हेअर मास्क लावल्यामुळे केस मजबूत आणि घनदाट होण्यास मदत होते.
हेअर मास्क बनवण्यासाठी आल्याचा तुकडा, कांदा, मोरिंगा पावडर, ऑर्गेनिक मध, ऑलिव्ह ऑईल इत्यादी साहित्य लागणार आहे. हेअर मास्क बनवताना सगळ्यात आधी कांद्याची साल काढून घ्या. त्यानंतर कांदा किसून त्यातील रस काढा आणि वाटीमध्ये ठेवा. कांद्याच्या रसात मोरींगा पावडर, ऑर्गेनिक मध आणि ऑलिव्ह ऑईल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण चमच्याने व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून घ्या. ४५ मिनिटं तयार केलेला हेअर मास्क केसांवर तसाच ठेवा. यामुळे केसांच्या मुळांना आतून पोषण मिळेल आणि केस चमकदार होण्यास मदत होईल. त्यानंतर सौम्य शाम्पूचा वापर करून केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आणि इतर आवश्यक घटक केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यास मदत करतात. याशिवाय केसांची मूळ मजबूत करण्यासाठी पोषण देतात. आल्यामध्ये असलेले अँटीसेप्टीक गुणधर्म केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करून टाळूवर आलेली खाज कमी करण्यास मदत करतात. कांद्याच्या रसात असलेले सल्फर केसांना तुटण्यापासून बचाव करते. वारंवार मोठ्या प्रमाणावर केस गळत असतील तर कांद्याचे मिश्रण किंवा कांद्याचा वापर करून बनवलेले तेल केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करावे. मध केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करते.