(Photo - X)
मुंबई : छटपूजेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दोन्ही नेते रसातळाला गेलेलं राजकारण करत असल्याची टीका करत त्यांनी १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत छटपूजा होणारच, असा ठाम दावा केला आहे. (Gunratna Sadavarte)
छटपूजा आणि कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमांना विरोध करण्यावरून सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य केले. ‘हे बालक आहेत, यांना बालकच म्हणावं लागेल’, अशा शब्दांत त्यांनी दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली. सण-उत्सवांच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याऐवजी लोकांच्या धार्मिक भावनांचा आदर केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
रेल्वेमध्ये भोजपुरी गाणी का वाजवली जातात, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाही सदावर्ते यांनी सुनावले. उत्सवी गाण्यांना डान्स बारमधील गाणी म्हणणे ही सांस्कृतिक दिवाळखोरी असल्याचे ते म्हणाले.
बिहारी असल्यामुळे एखाद्याचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान असल्याचे सांगत त्यांनी बिहार विमानतळावर छटपूजेची गाणी वाजवली जात असल्याचाही दाखला दिला.
सदावर्ते यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिले आहे. १५ नोव्हेंबरला जिथे छटपूजा सुरू असेल तिथे येऊन ती रोखून दाखवा, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या काही कार्यकर्त्यांमुळे छटपूजा थांबणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
छटपूजेला विरोध करणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, कलकत्ता न्यायालयाने छटपूजेला परवानगी दिल्याचा उल्लेख करत महाराष्ट्र सरकारनेही आवश्यक परवानगी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश एकच असल्याचेही ते म्हणाले.
आता सदावर्ते यांच्या या आव्हानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. छटपूजेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
Ans: मुंबईतील छटपूजेला होणाऱ्या कथित विरोधाच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी दोन्ही नेत्यांवर टीका केली आणि धार्मिक कार्यक्रमांना विरोध करू नये, अशी भूमिका मांडली.
Ans: १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत छटपूजा होणार असल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
Ans: छटपूजेला विरोध करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केल्याचे सांगत त्यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.






