
नारळी बागा, शांत लाटा आणि स्वर्गसुख… हिवाळ्यात कोकणातील 'या' निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची पर्यटकांना भुरळ
250 वर्षे जुने आहे देवी तारा मातेचे ‘हे’ मंदिर, गुप्त नवरात्रीत केले जातात अनुष्ठान
दिवेआगर
रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे थंडीच्या महिन्यात नंदनवनासारखे बहरून जाते. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणी साहसी खेळही प्रसिद्ध झाले आहेत. सुमद्रकिनारी फेरफटका, नैसर्गिक सौंदर्य अनुभवत घोड्यावरून रपेट मारायला जाणे असो किंवा बनाना बोट राइड, स्लीपर बोट राइड सारख्या थरारक खेळांचा आनंद घेणे असो हे सारे काही रोमहर्षक क्षण येथे तुम्ही अनुभवू शकता. एकीकडे कोळीबांधवांचा उत्स्फूर्तपणे काम करत असण्याचा नजारा प्रत्यक्षात अनुभवता येतो. पांढऱ्या शुभ्र सीगलचे थवे या पर्यटन स्थळाचे मुख्य आकर्षण आहेत. या किनाऱ्यावर अनेक स्थलांतरित पक्षी देखील पर्यटकांना पाहायला मिळतात.
तारकर्ली
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वसलेले तारकर्ली हे ठिकाण नेहमीच पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. समुद्रकिनारी असलेली शांतता, साहसी खेळांचा थरार, कासव, विविध जलचर प्राणी यामुळे तारकर्ली हे देशविदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. शहरांसारख्या ठिकाणी सतत धावपळ होत असताना पर्यटकांना तारकर्लीमधील शांतता खुणावते. येथील मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे जलक्रीडा. जलक्रीडा आणि त्यादरम्यान येणारे विविध अनुभव पर्यटकांना सुखावतात. इथल्या अनेक बीच शॅकवर तुम्ही सूर्यास्ताचे अद्भुत क्षण अनुभवत निवांत वेळ घालवू शकता. तारकर्ली हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्कूबा डायव्हिंग केंद्रापैकी एक केंद्र आहे. हाच साहसी अनुभव तुम्हीही तारकर्ली समुद्रकिनारी घेऊ शकता. येथे महाराष्ट्र शासनाचे स्कूबा डायव्हिंग केंद्रही आहे. या केंद्राच्या सहाय्याने स्कूबा डायव्हिंग करण्याची तुमची इच्छा पूर्ण होण्यास मदतही होईल.
श्रीवर्धन
शहरातील धावपळीचे आयुष्य, नेहमीच्या कामामधून स्वतःसाठी निवांत वेळ हवा अशी प्रत्येक चाकरमान्याची इच्छा असते. अशावेळी पर्यटक शांत व निसर्गरम्य पर्यटन स्थळांना पसंती दर्शवतात. दरम्यान शांतता आणि निसर्गाच्या कुशीत राहता यावे म्हणून श्रीवर्धन आणि त्या परिसरात असणारे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी उत्तम पर्याय आहेत. येथील स्वच्छ समुद्रकिनारा, लाटांचा आवाज आणि आजूबाजूचा सुंदर परिसर यामध्ये अनेकजण रमून जातात. पर्यटनाच्या बाबतही श्रीवर्धन अत्यंत समृद्ध आहे. येथील लक्ष्मी नारायण मंदिर, सुवर्ण गणेश मंदिर, जवळच असलेले हरिहरेश्वर आणि दिवेआगर व अन्य समुद्रकिनारे तुमचा सर्व थकवा बाजूला सारत निसर्गाचे मनमोहक दर्शन घडवते. श्रीवर्धनला ऐतिहासिक ओळखही आहे. याठिकाणी अजूनही पेशवेकालीन बऱ्याच वास्तू आणि मंदिरे पाहायला मिळतात. शांतता, निसर्गाचे सुंदर रुप अनुभवण्यासाठी तुम्ही श्रीवर्धनला येण्याचे नियोजन करु शकता.
वेळणेश्वर
चंद्रकोरीचा आकार असलेला, नारळी बागांनी वेढलेला वेळणेश्वर समुद्रकिनारा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे तुम्ही कुटुंबासह सहलीची मजा घेऊ शकता. वेळणेश्वरच्या समुद्रकिनारी असलेली स्वच्छताच पर्यटकांना अधिक आकर्षित करते. कला रसिक, वास्तुकलेच्या अभ्यासकांसाठी व शिवभक्तांसाठी किनाऱ्यावर वसलेल्या वेळणेश्वर मंदिराला भेट देणे एक अद्भुत आनंद ठरेल. महाशिवरात्रीला या मंदिरात मोठा उत्सव आयोजित केला जातो.
गुहागर
प्राचीन मंदिरे, नारळ पोफळीच्या बागा, सुपारीच्या बागा, हापूस आंबे यासाठी प्रसिद्ध असे गुहागर हे कोकणाचे वैभव आहे. शहराच्या मध्यभागी, आपल्याला शिव मंदिर, व्याडेश्वर ही प्राचीन मंदिरे पाहायला मिळतील. श्री विष्णू, विघ्नहर्ता श्रीगणेश, माता पार्वती, आणि माता लक्ष्मीच्या या मंदिराभोवती वेगवेगळी चार लहान मंदिरेही आहेत. प्राचीन दुर्गादेवी मंदिर हे काही अंतरावर असले तरी वास्तुकलेचे सुबक उदाहरण आहे. त्यामुळे येथेही भेट द्यायला तुम्ही विसरू नका. दिवस अखेरीस समुद्रकिनारी बसून, पायाला स्पर्श करणाऱ्या लाटांची गंमत अनुभवत सुर्यास्ताचे नेत्रसुखद दृश्य आपण पाहू शकता.
वेंगुर्ला
वेंगुर्ला हे करवंद, आंबा आणि काजूच्या उत्पादनातील एक महत्वाचे शहर आहे. एवढ्यापुरताच या शहराची ओळख मर्यादित नाही. येथील नयनरम्य समुद्रकिनारा या शहरास लाभलेला एक समृद्ध वारसाच म्हणता येईल. भारतीय स्विफ्टलेट पक्ष्यांच्या हव्याहव्याश्या गजबजाटाने हा किनारा प्रसन्न वाटतो. हिवाळ्यातील वेंगुर्ल्याचे सौंदर्य खरोखरच प्रत्येकाने अनुभवण्यासारखे आहे. स्वच्छ समुद्र किनाऱ्यालगत साहसी खेळांचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
हरिहरेश्वर
सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्या मुखावर हरिहरेश्वर हे गाव वसले आहे. महाराष्ट्रातील रमणीय शांत समुद्र किनाऱ्यांच्या यादीमध्ये हरिहरेश्वर किनाऱ्याचे नावही आवर्जुन घेतले जाते. डोंगर रांगा आणि मंदिरांनी वेढलेला हा परिसर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की, भगवान श्रीविष्णूंच्या पावन चरणांनी ही भूमी समृद्ध झाली अशी आख्यायिका आहे. ही जरी धार्मिक मान्यता असली तरी याठिकाणी भेट दिल्यावर एक अद्भुत शांतता तुम्हाला अनुभवता येईल. खरोखरच निसर्गाचा या ठिकाणी वरदहस्त आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. इथे फार
माणसांची गर्दीही नाही. स्वतःसोबत निवांत क्षण अनुभवायची इच्छा असेल तर हा समुद्रकिनारा तुमची वाट पाहतोय!
वेळास
मंडणगड किंवा दापोली येथून हाकेच्या अंतरावर असलेला सुंदर समुद्रकिनारा म्हणजे वेळास समुद्रकिनारा. सामन्यातः समुद्रकिनारी माणसांची गर्दी आपण पाहिली असेल, पण या किनाऱ्याचे वैशिष्ट्य असे की, इथे चक्क कासवांची जत्रा भरते. मागील कित्येक वर्षांपासून फेब्रुवारी-एप्रिलच्या मध्यापर्यंत, वेळास समुद्रकिनारी दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासव गर्दी करतात. आंजर्ले या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या समुद्रकिनारी एप्रिलमध्ये कासव महोत्सव आयोजित केला जातो. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचे समुद्राच्या दिशेने पडणारे पहिले पाऊल पाहण्याचा हा अनुभव खरोखरच विलक्षण असतो. थंडगार बेभान वारा, फेसाळत्या समुद्राच्या लाटा, नारळी पोफळीच्या बागा आणि सोबत कोकणी मेजवानी! या सहलीचे नियोजन करण्यासाठी हिच कारणे तुम्हाला पुरेशी आहेत.
हर्णे आणि मुरुड
हर्णे आणि मुरुड ही दोन टुमदार शहरे स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. हर्णे समुद्रकिनारा हा मच्छीमारांसाठी मोक्याचे ठिकाण आहे. येथे मासळी पकडून किनाऱ्यालगतच्या बाजारात तिचा लिलाव केला जातो. याठिकाणी खरेदीच्या निमित्ताने तशी बरीच गर्दी असते. म्हणूनच आपल्याला जर एकांत अनुभवायचा असेल तर मुरुड समुद्रकिनारा आपल्यासाठी अधिक उत्तम ठरेल. येथे अनेक जलतरणपटूही सरावासाठी येत असतात. हर्णे बंदराजवळच सुवर्णदुर्ग व कनकदुर्ग हे समुद्रीकिल्ले मोठ्या दिमाखात उभे आहेत. मुरुडचे दुर्गादेवी मंदिर आणि आंजर्ले टेकडीवरील गणपती मंदिर भाविकांना खास आकर्षित करते.
गणपतीपुळे
राज्यातील मोजक्या पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यांपैकी एक असलेला गणपतीपुळे समुद्रकिनारा येथील जुन्या स्वयंभू गणपती मंदिरामुळे पर्यटक व भाविकांना आकर्षित करतो. हिरवीगर्द झाडी असणारे रस्ते, लाल माती आणि श्रीगणेशाचा वरदहस्त असणारे हे पर्यटनस्थळ अतिशय नयनरम्य व मनाला शांतता देणारे आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्याच्या किरणांनी जेव्हा येथील किनारा व मंदिर न्हाऊन निघते, तो एक क्षण आपल्याला निसर्गाची किमया पटवून देतो. शिवाय साहसी खेळांचा अनुभवही येथे तुम्हाला घेता येईल.
बोर्डी डहाणू
डहाणूमधील मुख्य पर्यटन आकर्षण म्हणजे डहाणू-बोर्डी किनारा. हा चिकू आणि अन्य फळांच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. हे हरित क्षेत्र असल्यामुळे शहरीकरणापासून मुक्त आहे. गोंगाटापासून दूर आणि चोहीकडे हिरवळ असल्याने इथे निवांत क्षण घालवायला एकदा तरी यायलाच हवे. जवळपास 17 किमी वर पसरलेल्या समुद्रकिनारी चालताना एका बाजूला खारफुटीची वने आणि दुसरीकडे अथांग समुद्र असे मोहक दृश्य पाहायला मिळते. येथे भेट देण्याचे नियोजनही तुम्ही करु शकता. रामायण मालिकेचे चित्रण झालेल्या उंबरगाव येथील प्रसिद्ध वृंदावन स्टुडिओला आपण आवर्जून भेट द्यावी. सकाळी सूर्योदय आणि सायंकाळी सूर्यास्त पाहत आपण एक दिवसाची छोटी सहल पूर्ण करू शकता.
फिरण्याचे शौकीन आहात? मग Travel Insurance चे फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवेत…
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागची ३१ मे २००६ रोजी स्थापना झाली. राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या विभागाची स्थापना करण्यात आली. पर्यटन आणि संस्कृती यांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. कारण ऐतिहासिक स्मारके, लोककला आणि स्थानिक परंपरा या केवळ सांस्कृतिक ठेवा नसून पर्यटन आकर्षण म्हणूनही ओळखल्या जातात. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ स्तरावरील विभाग स्थापन केला.
सदर विभाग महाराष्ट्रातील अद्वितीय कला प्रकार, परंपरा आणि ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी, त्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी कार्य करतो. तसेच, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवून, पर्यटन विकासाला चालना देऊन हा विभाग राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. सदर विभागाच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य केवळ एक पर्यटन स्थळ म्हणूनच नव्हे, तर एक जिवंत संस्कृती आणि वारसा असलेले राज्य म्हणून अधिक समृद्ध आणि आकर्षक बनत आहे.