फुफ्फुसाचा कर्करोग कसा पसरतोय
भारत देश हळूहळू फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या साथीच्या दिशेने वाटचाल करत आहे का? हा प्रश्न आज देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे. पूर्वी हा आजार फक्त धूम्रपान करणाऱ्यांनाच होत होता, आता धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक ‘द लॅन्सेट’मध्ये आशियातील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या प्रकरणांचा आढावा घेताना धक्कादायक बाब समोर आली आहे.
भारतातील फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांचे प्रोफाइल पाश्चात्य देशांपेक्षा खूपच वेगळे आहे. येथे, जे लोक धूम्रपान करत नाहीत त्यांना देखील फुफ्फुसाचा कर्करोग होताना दिसून येत आहे आणि त्यांचे आयुष्य पाश्चात्य देशांमधील लोकांपेक्षा यामुळे 10 वर्षे कमी होऊ शकते. काय सांगतो अभ्यास जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
२२ लाख व्यक्तींना त्रास
फुफ्फुसाचा कर्करोग
जर आपण जागतिक आकडेवारीची तुलना केली तर, जगभरात 22 लाख नवीन प्रकरणे (11.6%) नोंदविण्यात आली आहेत आणि त्यापैकी 17 लाख मृत्यू (18%) झाले असल्याचे या अभ्यासात समोर आले आहे. भारतात, फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे दरवर्षी 72,510 प्रकरणे (5.8%) आणि 66,279 मृत्यू (7.8%) होतात.
भारतीय रूग्णांच्या ‘वैशिट्यां’वर प्रकाश टाकताना, लेखकांपैकी एक असणारे , टाटा मेमोरियल सेंटरच्या मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे डॉ. कुमार प्रभाश यांनी सांगितले की, इथे असलेल्या फुफ्फुसाच्या कर्करोगाचे 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण धुम्रपान करत नाहीत.
काय आहे मुख्य कारण
अभ्यासात असे आढळून आले आहे की धुम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी महत्त्वपूर्ण जोखीम घटकांमध्ये वायू प्रदूषण (विशेषत: कण PM2.5), एस्बेस्टोस, क्रोमियम, कॅडमियम, आर्सेनिक आणि कोळशाचा समावेश आहे. अनुवांशिक संवेदनाक्षमता, हार्मोनल स्थिती आणि आधीपासून अस्तित्वात असलेला फुफ्फुसाचा आजार यासारखे घटकदेखील धुम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या वाढत्या घटनांमध्ये भूमिका बजावू शकतात असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
काय सांगतात तज्ज्ञ
फुफ्फुसाच्या कर्करोगाबाबत तज्ज्ञांचे म्हणणे काय आहे
डॉ. प्रभाश पुढे म्हणाले की, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी आहे. अमेरिकेत फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण 1000 मध्ये 30 आहे, तर भारतात 1000 मध्ये 6 आहे. पण भारतातील प्रचंड लोकसंख्येचा विचार करता, 6% देखील रुग्णांची संख्या ही मोठी आहे.
याशिवाय भारतातील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या समस्येचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टीबीचे प्रमाण जास्त आहे. टीबी आणि फुफ्फुसाचा कर्करोग हे एकमेकांसारखेच असल्यामुळे निदान होण्यास अनेकदा उशीर होतो. या संदर्भात नवीन उपचार आणि औषधे मिळणे सोपे नाही. बहुतेक उपचार परदेशात विकसित केले जातात आणि ते आयात केल्याने खर्च वाढतो, त्यामुळे मृत्यूच्या संख्येतही अधिक वाढ होताना दिसून येत आहे.