Roti Frankie Recipe : तुम्हीही शिळ्या झालेल्या चपात्या दुसऱ्या दिवशी फेकत असाल तर तुम्ही मोठी चूक करत आहात. शिळ्या चपात्या फेकून न देता यापासून तुम्ही लहान मुलांच्या आवडीची चविष्ट फ्रँकी तयार करु शकता. यामुळे अन्नाचा अपव्यय देखील होणार नाही.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
अनेकदा असं घडतं की, घरी जेवणानंतर काही एस्ट्रा चपात्या शिल्लक राहतात.
या चपात्या पुन्हा खाण्याचा कंटाळा करुन त्या बऱ्याचदा फेकून दिल्या जातात.
पण तुम्ही यांचा वापर करुन शिळ्या चपात्यांपासून नवीन पदार्थ तयार करु शकता.
रोजच्या जेवणानंतर चपाती उरली की ती दुसऱ्या दिवशी कशी वापरायची, हा प्रश्न अनेकदा पडतो. उरलेली चपाती पुन्हा गरम करून खाण्याऐवजी त्यापासून चटपटीत आणि स्वादिष्ट फ्रँकी तयार करता येते. बाजारात मिळणाऱ्या स्ट्रीट स्टाईल फ्रँकीसारखी चव घरच्या घरी मिळवण्यासाठी फक्त योग्य मसाले, ताज्या भाज्या आणि चटणीचा वापर करणे महत्त्वाचे आहे. उरलेल्या चपातीचा बेस तयार असल्यामुळे ही रेसिपी वेळही वाचवते. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही हा चपाती फ्रँकीचा पर्याय उत्तम ठरू शकतो. त्यात आपल्या आवडीप्रमाणे पनीर, चीज, अंडे किंवा वेगवेगळ्या भाज्याही घालता येतात. चला रेसिपीनोट करून घेऊयात.
साहित्य
उरलेल्या चपाती – ४
कांदा – १ बारीक चिरलेला
शिमला मिरची – १ बारीक चिरलेली
गाजर – १ बारीक चिरलेले
उकडलेला बटाटा – १
कोबी – ½ कप बारीक चिरलेला
आले-लसूण पेस्ट – १ चमचा
लाल तिखट – ½ चमचा
हळद – ¼ चमचा
गरम मसाला – ½ चमचा
चाट मसाला – ½ चमचा
टोमॅटो सॉस – १ चमचा
हिरवी चटणी – २ चमचे
लिंबाचा रस – १ चमचा
मीठ – चवीनुसार
तेल – आवश्यकतेनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर – थोडी
कृती
कढईत थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट घाला. कांदा थोडा परतल्यानंतर शिमला मिरची, गाजर आणि कोबी घालून मध्यम आचेवर भाज्या परता.
भाज्या थोड्या मऊ झाल्यावर उकडलेला बटाटा हाताने कुस्करून त्यात घाला. त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ टाका. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून २ ते ३ मिनिटे परता.
आता टोमॅटो सॉस आणि थोडा लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले ढवळा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा. फ्रँकीचे सारण फार ओले ठेवू नका.
तवा गरम करून त्यावर उरलेली चपाती ठेवा. दोन्ही बाजूंनी हलकी गरम करून घ्या. चपाती जास्त वेळ भाजू नका, अन्यथा ती कडक होऊ शकते.
गरम चपातीवर हिरवी चटणी पसरवा. त्यावर तयार केलेले भाजीचे सारण मध्यभागी ठेवा. आवडत असल्यास यावर थोडा चाट मसाला किंवा किसलेले चीजही घालू शकता.
चपातीच्या दोन्ही बाजू थोड्या आत दुमडून ती घट्ट रोल करा. सारण बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या. रोलला बटर पेपर किंवा फॉइलमध्ये गुंडाळल्यास तो खाण्यास सोपा होतो.
तयार फ्रँकी पुन्हा तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी १-२ मिनिटे हलकी भाजून घ्या. बाहेरून थोडी कुरकुरीत आणि आतून मसालेदार झाल्यावर गरमागरम सर्व्ह करा.
जाहिरात
जाहिरात
Web Title: Make tasty veg frankie from leftover chapati nb