Raigad News: इमारत तयार, पण रुग्णालय सुरू होईना! खोपोलीकरांची प्रतिक्षा कायम, नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
खोपोली नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी जुन्या रुग्णालयाच्या इमारतीऐवजी नवीन सुसज्ज इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ११ फेब्रुवारी २०२४ रोजी स्थानिक आमदार, माजी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत या नवीन रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून ४० बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, भूमिपूजनाच्या वेळी मोठ्या उत्साहात करण्यात आलेल्या घोषणांनंतर प्रत्यक्ष रुग्णालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळाली नसल्याचे चित्र आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्णत्वाकडे गेल्यानंतर नागरिकांमध्ये आरोग्यसेवा सुरू होण्याबाबत अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मात्र, इमारत उभी राहूनही रुग्णालय प्रत्यक्षात सुरू झालेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. इमारत उभारण्यात आली; मग आता रुग्णालय सुरू करण्यासाठी नेमकी कोणती अडचण निर्माण झाली आहे? काम पूर्ण झाले असल्यास लोकार्पण आणि आरोग्यसेवा सुरू करण्यास विलंब का होत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती, झालेला खर्च, उर्वरित कामे आणि रुग्णालय सुरू करण्याची निश्चित तारीख याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांसमोर स्पष्ट माहिती येणे आवश्यक आहे. खोपोली शहरात ४० बेडचे रुग्णालय सुरू झाल्यास नागरिकांसह अपघातग्रस्तांसाठीही दिलासा मिळू शकतो.






