कर्जत : १८५० मध्ये ब्रिटिशांनी माथेरानचा शोध लावला. १९०७ मध्ये आदमजी पिरभोय यांनी नेरळ-माथेरान असा रेल्वे मार्ग शोधून काढlला आणि पहिल्यांदा माथेरान हे कोणत्या तरी वाहनांच्या मार्गाने जोडले गेले. त्याआधी माथेरानला जाण्यासाठी पायी किंवा घोड्यावर जावे लागत असे. मुंबईमधील काही गिरण्यांचे मालक असलेले पिरभोय यांना माथेरानला जाण्यासाठी नेरळ येथे रेल्वेने आल्यानंतर घोडा मिळाला नाही. म्हणून त्यांनी त्यावेळी १७ लाख रुपये खर्चून रेल्वेमार्ग शोधून काढून तो २१ किलोमीटरचा मार्ग नेरळ-माथेरान मिनीट्रेन १९०७ मध्ये सुरू झाली. नेरळ-माथेरान हा मार्ग शोधून काढल्याने ब्रिटिश सरकारने आदमजी पीरभॉय यांना सर ही पदवी दिली.
त्यावेळी ही ट्रेन कोळशापासून तयार होणाऱ्या वाफेवर चालायची. १९१४ मध्ये कोळशापासून आग निर्माण करणारी इंजिने ब्रिटिशांनी जर्मनीमध्ये तयार करायला लावली. त्यावेळी माथेरान मिनीट्रेन शिवाय, दार्जिलिंग येथील मिनीट्रेनसाठी देखील अशीच इंजिने आवश्यक असल्याने त्यांची निर्मिती करण्यात आली. १९१७ मध्ये नेरळ-माथेरान मिनीट्रेन नॅरोगेज मार्गासाठी तीन इंजिन आणले गेले. त्यातील एनडीएम ७९४ बी हे इंजिन आजही नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या सेवेत असून अन्य दोन इंजिन आज रेल्वे प्रशासनाने हेरिटेज ठेवा म्हणून जतन करण्याचा निर्णय घेऊन माथेरान रेल्वे स्थानक आणि नवी दिल्ली येथील रेल भवन येथे उभी करून ठेवली आहेत. सध्या नेरळ लोको येथे असलेले कोळशावर चालणारे इंजिन आपली शतक महोत्सवी परंपरा निर्माण करून सेवेत कायम आहे.
नेरळ-माथेरान मार्गावर नॅरोगेज ट्रॅक, तेथील स्थानके यांचे पर्यटकांना आकर्षण व्हावे यासाठी स्थानके देखील सुशोभित केली जात आहेत. नेरळ, जुम्मापट्टी, वॉटर पाईप, अमन लॉज आणि माथेरान स्थानकात प्रवासी, पर्यटकांच्या सोयीसाठी विविध कामांना प्राधान्य दिले जात आहे. त्यात रंगरंगोटी, बैठक व्यवस्था, बगीचा, किरकोळ दुरुस्तीची कामे यांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यात वॉटर पाईप येथे निवारा शेड, पाणपोई यांची व्यवस्था नव्याने केली जात असून जुम्मापट्टी स्थानकात गार्डन विकसित केले जात आहे. नेरळ स्थानकात सर्व चारही फलाट यांची उंची वाढविण्यात येत असून आकर्षक रंगसंगती यांची कामे मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे विद्यार्थी चारही स्थानकात करणार आहेत.
सध्या माथेरानला जाण्यासाठी नेरळ येथून जाणारी मिनिट्रेन या मार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. त्यात गेल्या काही वर्षांपासून नेरळ-माथेरान-नेरळ ही मिनीट्रेन सेवेचे ऑनलाईन तिकीट बंद आहे. त्यामुळे विदेशी पर्यटक मागील काही वर्षात माथेरानकडे फिरकत नाहीत. त्यात माथेरानचे पर्यटन आणि मिनीट्रेन हे समीकरण अनेक दशके सुरू आहे. त्यामुळे मिनिट्रेन सुरूच राहावी हे माथेरानच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.






