फोटो सौजन्य - Social Media
साउथ आफ्रिकन टूरिझमच्या २१व्या अॅन्युअल इंडिया रोडशोचा समारोप मुंबईत झाला. या रोडशोदरम्यान दक्षिण आफ्रिकेला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांमध्ये तब्बल ६३.६ टक्के वाटा मुंबईकरांचा असल्याचे समोर आले. साउथ आफ्रिकन टूरिझमच्या आशिया, ऑस्ट्रेलिया आणि मध्य-पूर्व विभागाचे प्रादेशिक महाव्यवस्थापक ग्कोबानी मांकोतायवा यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या रोडशोमध्ये ५०० हून अधिक ट्रॅव्हल ट्रेड एजंट्स सहभागी झाले. भारतातील प्रवास समुदायाशी संबंध दृढ करणे आणि नवीन संधी शोधणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते.
मांकोतायवा म्हणाले, “भारत हा दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटनासाठी उच्च प्राधान्याचा देश आहे. कौटुंबिक सहली, साहसी मोहिमा आणि लग्झरी पर्यटन यांना मोठी मागणी आहे. विशेषतः ४० वर्षांवरील प्रवाशांची संख्या वाढत आहे, तसेच युवा प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.” २०२४ मध्ये ७५,५४१ भारतीय पर्यटकांनी दक्षिण आफ्रिकेला भेट दिली, त्यात ६३.६ टक्के मुंबईकर होते. त्यामुळे या प्रदेशात आउटबाउंड मार्केटिंगची मोठी संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बॉलिवूड आणि क्रिकेट यांसारख्या लोकप्रिय विषयांना धोरणात्मक महत्त्व दिले जात आहे.
मुंबईतील पर्यटक प्रामुख्याने व्यवसाय, चैनीच्या सहली आणि साहसी पर्यटनासाठी दक्षिण आफ्रिकेचा विचार करतात. २०२४ मध्ये ४२.३ टक्के प्रवाशांनी व्यवसाय दौऱ्यांना जोडून चैनीचे उपक्रम केले, तर १८.५ टक्के प्रवाशांनी साहसी अनुभवांमध्ये रस दाखवला. दक्षिण आफ्रिकेत पर्यटन अधिक सुलभ आणि आकर्षक करण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये प्रमुखतः इलेक्ट्रॉनिक ट्रव्हल ऑथरायझेशन (ईटीए) आणि ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम (टीटीओएस) कार्यान्वित करण्याचा समावेश आहे. ईटीएमुळे प्रवाशांना व्हिसा प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान करता येणार आहे, तर टीटीओएसमुळे अधिकृत आणि विश्वासार्ह टूर ऑपरेटर्सद्वारे पर्यटकांना उत्तम सुविधा मिळणार आहेत.
तसेच, भारत-दक्षिण आफ्रिका थेट हवाई मार्ग प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. या थेट उड्डाणसेवेचा लाभ भारतीय प्रवाशांना होईल, कारण यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होतील. दक्षिण आफ्रिका २०२५ मध्ये जी-२० अध्यक्षपद स्वीकारणार असून, पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यावर भर देणार आहे. भारतीय पर्यटकांसाठी अधिक सुविधा निर्माण करून आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी साउथ आफ्रिकन टूरिझम भारतातील पर्यटन क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवण्यास कटिबद्ध आहे. त्यामुळे भविष्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पर्यटन संबंध अधिक मजबूत होतील आणि दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.