मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी टिप्स
आजकाल मुलं संपूर्ण वेळ टीव्ही, टॅब अथवा मोबाईलवर दिसतात. यामुळे मुलांच्या जनरल नॉलेजमध्ये वाढ होत असली तरीही त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास मात्र होत नाही. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पालकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. मुलांचा विकास हा केवळ त्यांना स्वतःला करता येत नाही.
नैसर्गिक गोष्टींसह पालकांनी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायला हवे. रिलेशनशिप तज्ज्ञ अजित भिडे यांनी काही निवडक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळू शकते. (फोटो सौजन्य – iStock)
खेळण्याची वेळ ठरवा
मुलांना खेळू देणे महत्त्वाचे
सर्वप्रथम मुलांच्या शारीरिक विकासासाठी त्यांना दिवसातून किमान एक तास बाहेर खेळण्यासाठी बाहेर काढा. त्याच्यासाठी योग्य ती वेळ निश्चित केरा. त्यांचे शरीर मजबूत करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांनी घराबाहेर पडून खेळायला हवे.
मुलांसाठी 15 मिनिट्स वेळ काढा
याशिवाय, पालकांनी दिवसातून किमान 15 मिनिटे वेळ काढून आपल्या मुलासोबत हवे ते खेळावे किंवा त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारच्या खेळात भागीदार व्हावे. असे केल्याने मुलांना अधिक आत्मविश्वास मिळतो आणि त्यांना आपल्या पालकांशी हितगुज साधणे सोपे होते.
वाचनाची गोडी लावणे
अभ्यासाशिवाय वाचनाने ज्ञान वाढते
तुमच्या मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावा. ही वाचनाची सवय शालेय पाठ्यपुस्तकापासून वेगळी असावी. तुमच्या मुलाला किमान 20 मिनिटे स्वतः पुस्तक वाचून दाखवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याबरोबर बसा आणि त्यांना मोठ्याने वाचायला लावा. गोष्टीची पुस्तके वाचण्याचा त्यांना छंद लावल्यास त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत मिळते.
एकत्र जेवण्याची सवय
याशिवाय कुटुंबासोबत एकत्र जेवणाची सवय लावा. यामुळे मुलाला हसतखेळत घरच्यांशी बोलता येईल आणि त्याचे नाते अधिक घट्ट होईल. यावेळी, तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टींबद्दल बोलू नका.तसंच जेवणाच्या वेळी खेळीमेळीचे वातावरण राहील याची काळजी घ्या जेणेकरून मुलांना घर आणि घरातील माणसांविषयी अधिक प्रेम निर्माण होईल.
झोपण्यापूर्वी गोष्टी सांगा
झोपण्यापूर्वी एकत्र वेळ घालवा
झोपण्यापूर्वी आपल्या मुलाला आपल्या बालपणाची गोष्ट सांगा. यामुळे मूल तुमच्याशी अधिक घट्ट नाते जोडू शकेल आणि कल्पना करू शकेल. इतकंच नाही तर यावेळी तुम्ही मुलाला शाळेची गोष्ट, पार्कची गोष्ट, स्कूल बसची गोष्ट वगैरे सांगायला सांगा. त्यांच्या गोष्टीदेखील ऐका.
कामात सहभागी करून घ्या
जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा मुलाला घरातील कामातही भाग घेण्याची संधी द्या. उदाहरणार्थ, जर घराची साफसफाई केली जात असेल तर त्याला सामान बांधायला सांगा, बागकाम करताना पाणी घालायला सांगा किंवा किचनमध्ये काही गोष्टींमध्ये त्यांना मदत करायला सांगा. यामुळे त्यांना काळजी घेणे, जबाबदारीने वागणे या गोष्टी कळतात.
बोलण्याची संधी द्या
व्यक्त होण्यास मदत करा
याशिवाय आपल्या मुलांना बाहेरील लोकांशीही बोलण्याची संधी मिळेल याची खात्री करून घ्या. यामुळे त्यांच्या मनातील अथवा डोक्यातील कोणताही संकोच कमी होईल. एवढेच नाही तर त्याला किमान अर्धा तास द्या ज्यात तो त्याच्या आवडीचे काम करू शकेल
या सर्व सवयींनी त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळते आणि अधिक आत्मविश्वसाने आणि हसतखेळत मुलं काम करतात त्यांचा अधिक विकास होतो.