संग्रहित फोटो
यावेळी युगेंद्र पवार म्हणाले की, बारामती शहरातील सामान्यांचे प्रश्न अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, हे प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीसाठी सामोरे जाणार आहोत. सत्ताधारी पक्षाकडे जे उमेदवार आहेत ते श्रीमंत, धनदांडगे व कॉन्ट्रॅक्टर आहेत. मात्र ते नगरपालिकेत गेल्यानंतर जनतेचे प्रश्न मांडणार नाहीत. मात्र आमच्याकडे जे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत, ते सामान्य असले तरी शिक्षित आहेत, त्यांना लोकांच्या प्रश्नाची जाणीव आहे. बारामती शहरांमध्ये एका बाजूला विकासाचा दावा केला जात असला तरी दररोज अपघात होत आहेत, यामध्ये अनेकांना जीव गमवावे लागले. अनेक भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे.
बारामती शहरातील पाणीपट्टी व घरपट्टी जास्त आहे, यासह इतर मूलभूत प्रश्न घेऊन आम्ही बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सामोरे जाणार आहोत. बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ४२ पैकी २० ते २५ उमेदवार असतील, उर्वरित उमेदवार मित्र पक्ष व अपक्ष असतील. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तीन दिवसात आपण जाहीर करणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.
निवडणुकीसाठी तरुणांना जास्त संधी
ही निवडणूक आम्ही बारामतीच्या जनतेसाठी लढविणार आहोत. आमचे उमेदवार हे लोकांमध्ये असलेले उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी आम्ही जास्त करून तरुणांना जास्त संधी दिली आहे. एक महिन्यापूर्वी पवार साहेबांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही ५०% पेक्षा जास्त तरुणांना संधी देणार असल्याचे जाहीर केले होते, त्यानुसार आम्ही या निवडणुकीत तरुणांना अधिक संधी दिली आहे. काही प्रभागामध्ये आम्ही अनुभवी लोकांना संधी देणार आहोत.






