
CSU (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
क्रॉनिक अर्टिकारिया आजारामध्ये सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ अंगावर सतत पित्त उठणे, सूज येणे किंवा दोन्ही त्रास वारंवार होतात. याचाच एक प्रकार म्हणजे क्रॉनिक स्पॉन्टेनियस अर्टिकारिया (सीएसयू), यामध्ये कोणतेही बाह्य कारण किंवा ट्रिगर नसतानाही ही लक्षणे अचानक दिसू लागतात. एखाद्या विशिष्ट घटकाशी संबंधित असणाऱ्या अॅलर्जीच्या प्रतिक्रियेपेक्षा हे वेगळे असते. सीएसयूमध्ये नेमका त्रास कशामुळे सुरू झाला याचे कोणतेही स्पष्ट कारण नसतानाही वारंवार ही लक्षणे उद्भवू शकतात. हा फरक वेळेत ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामुळे योग्य उपचार आणि लक्षणांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत होते.
ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सच्या कन्सल्टंट डर्माटोलॉजिस्ट डॉ. विशालाक्षी विश्वनाथ म्हणाल्या, “अंगावर वारंवार पित्त उठणे हे प्रत्येक वेळी अॅलर्जीचे लक्षण असेल असे नाही. कोणतेही स्पष्ट कारण नसताना लक्षणे सतत दिसत राहतात किंवा पुन्हा पुन्हा उद्भवतात, तेव्हा त्यामागे क्रॉनिक स्पॉन्टेनियस अर्टिकारिया हे संभाव्य कारण असू शकते. डर्माटोलॉजिस्टचा सल्ला घेतल्यास या लक्षणांमागील नेमके कारण शोधून काढणे आणि योग्य उपचारांची दिशा ठरवणे शक्य होते. विशेषतः वारंवार उठणारे हे पित्त झोपेत अडथळा आणू लागते, अस्वस्थता वाढवते किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागते, तेव्हा वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत गरजेचे ठरते.”
वारंवार उठणारे पित्त ही अॅलर्जी नसू शकते हे समजून घेण्यासाठी खालील पाच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे:
अंगावर पित्त उठणे म्हणजे त्वचेवर अचानक लालसर, खाज येणारे चट्टे तयार होणे, जे शरीराच्या कोणत्याही भागावर दिसू शकतात. हे अॅलर्जीच्या प्रतिक्रियेमुळे होऊ शकत असले, तरी सीएसयूचेही प्रमुख लक्षण आहे, ज्यामध्ये कोणतेही बाह्य कारण नसतानाही हा त्रास उद्भवतो.
त्यामुळे वारंवार अंगावर पित्त उठल्यास ते केवळ एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थ, उत्पादन किंवा वातावरणातील घटकांमुळे होत आहे असे मानू नये. लक्षणांचे स्वरूप आणि रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अभ्यासून आरोग्य तज्ज्ञ नेमकी काय समस्या आहे याचे योग्य मूल्यांकन करू शकतात.
अंगावर पित्त उठण्याचा त्रास सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत होतो, तेव्हा त्या स्थितीला क्रॉनिक अर्टिकारिया मानले जाते. सीएसयूमध्ये त्वचेवर उठलेले चट्टे सहसा २४ तासांच्या आत नाहीसे होतात, पण शरीराच्या दुसऱ्या भागावर नवीन चट्टे उमटू शकतात. त्यामुळे दोन त्रासांच्या मधील काळात त्वचा अगदी सामान्य दिसत असली, तरीही हा आजार शरीरात सुरू राहू शकतो.
अंगावर पित्त कधी उठते, ते किती वेळ टिकते आणि सोबत सूज येते का, याची नियमित नोंद ठेवल्यास डॉक्टरांशी सल्लामसलत करताना ही माहिती निदानासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
लक्षणे पुन्हा पुन्हा उद्भवतात, तेव्हा हा त्रास पुन्हा होऊ नये म्हणून व्यक्ती आहारात बदल करणे, स्किनकेअर उत्पादने बदलणे किंवा रोजच्या सवयी टाळणे सुरू करतात. पण, सीएसयूच्या बाबतीत शोधता येईल किंवा टाळता येईल असा कोणताही ठरावीक बाह्य घटक किंवा ट्रिगर नसतो.
काही गोष्टींमुळे काही व्यक्तींमध्ये ही लक्षणे अधिक तीव्र होत असली, तरी याचा अर्थ त्या गोष्टी या समस्येचे मूळ कारण आहेत असा होत नाही. डर्माटोलॉजिस्ट पुढील चाचण्यांची गरज आहे का याचे मूल्यांकन करू शकतात आणि रुग्णांना अनावश्यक निर्बंध टाळण्यास मदत करू शकतात.
सतत खाजेमुळे झोपमोड होऊ शकते, दिवसा थकवा जाणवू शकतो आणि कामावर लक्ष केंद्रित करणे किंवा रोजची कामे सांभाळणे आव्हानात्मक होऊ शकते. तसेच, अंगावर स्पष्ट दिसणारे चट्टे किंवा सूज यामुळे इतर व्यक्तींमध्ये वावरताना अस्वस्थता किंवा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो.
ही लक्षणे पुन्हा कधी उद्भवतील याची अनिश्चितता मानसिक ताण आणखी वाढवू शकते. सीएसयू केवळ त्वचेच्या बाह्य रूपावरच परिणाम करत नाही, तर संपूर्ण जीवनशैलीच्या दर्जावर आणि मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम करू शकतो.
वारंवार अंगावर पित्त उठण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात, त्यामुळे योग्य उपचारांच्या दृष्टीने नेमकी समस्या ओळखणे ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. डर्माटोलॉजिस्ट किंवा अॅलर्जिस्ट लक्षणांचा कालावधी आणि त्यांचे स्वरूप तपासून, वैद्यकीय इतिहास अभ्यासून पुढील चाचण्यांची गरज आहे का हे ठरवू शकतात.
सीएसयूवरील उपचार प्रामुख्याने लक्षणांवर नियंत्रण मिळवण्यावर केंद्रित असतात. हे उपचार वैद्यकीय मूल्यमापन आणि उपचारांना शरीर देणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून असतात. कोणतीही स्पष्ट अॅलर्जी कारणीभूत नसते, तेव्हा केवळ संशयित घटक वारंवार टाळल्याने ही लक्षणे पूर्णपणे थांबत नाहीत.
थोडक्यात सांगायचे तर, अंगावर वारंवार उठणाऱ्या पित्ताकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, विशेषतः ही समस्या कित्येक आठवडे टिकून राहते किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना पुन्हा पुन्हा उद्भवते. प्रत्येक वेळी होणारा त्रास केवळ अॅलर्जीमुळे आहे असे गृहीत धरण्याऐवजी या लक्षणांचे स्वरूप समजून घेऊन डर्माटोलॉजिस्टकडून योग्य तपासणी करून घेणे रुग्णांना या लक्षणांचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दिशेने मदत करू शकते.