मोठ्या उत्साहात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सोसायटीतील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच कोजागिरी पौर्णिमेचे वेध लागतात. या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं साजरं रुप आणि टपोरं चांदणं पाहायला मिळत असतं. कोजागिरीला सर्व जण रात्री बारा वाजेपर्यंत जागुन ही पौर्णिमा साजरा करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध आणि तांदळाची खीर तयार करून ती चंद्राच्या प्रकाशात ठेवण्याला महत्त्व आहे. खीरीमध्ये चंद्राचा प्रकाश शोषून घेण्याची क्षमता अधिक असते असं मानलं जातं. या दिवशी चांदण्यांसोबतच अमृताचा वर्षाव होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. यासाठी चंद्राच्या शातल प्रकाशात ठेवलेली खीर आरोग्यसाठी लाभदायक असते. कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो असे मानले जाते. यासाठी हा दिवस धन प्राप्तीच्या दृष्टीने आणि घरात समृद्धी येण्यासाठी खूपच चांगला समजला जातो.
कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व
कोजागिरीला प्रत्येक प्रांतात वेगवेगळी नावाने ओळखले जाते. गुजरातमध्ये ‘शरद पूर्णिमा’, ओडिशामध्ये ‘कुमार पौर्णिमा’, बंगालमध्ये ‘लोख्खी पूजो’ असे म्हणतात.
नवरात्र सुरू होण्यापूर्वी पितृपक्ष येतो आणि यात पितर पृथ्वीवर येतात. यावेळी पृथ्वीवर आलेल्या पितरांचे निवासस्थान चंद्रलोकात असते अशातच कोजागिरी पौर्णिमेच्या शीतलतेमुळे त्यांचा प्रवास सुखाचा होतो असा समज आहे. या तिथीला अनेक ठिकाणी नद्या किंवा कालव्यात दिवे सोडून पितरांना निरोप दिला जातो. नवरात्रीत अनेकजण कठोर तप करतात. या तपामुळे प्राप्त झालेली उर्जा त्यांच्या मस्तकात साठविली जाते. असं म्हणतात की मस्तकात साठवलेली उर्जा पूर्ण शरीरात प्रवाहित व्हावी यासाठी साधक कोजागिरी पौर्णिमेला पूजा पाठ करतात. त्यांची उर्जा सहज प्रवाहित करण्याची क्षमता चंद्राच्या शीतलतेमुळे प्राप्त होते आणि खीरीमुळे त्यांना शक्ती मिळते. यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूजा करणे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोजागिरीचे दुध पिण्याचा सल्ला दिला जातो.