
बालकांमध्ये वाढतंय हृदयविकाराचे प्रमाण, हृदयदोषासह बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर गंभीर परिणाम
लहान मुलांमध्ये का वाढतो हृदय रोगाचा धोका?
हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येणारी लक्षणे?
बालकांमध्ये हृदय दोषाची कारणे?
नागपूर :प्रौढांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याचे यापूर्वीच दिसून आले आहे. मात्र आता बालकांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. शासनाच्या विविध आरोग्यविषयक कार्यक्रमाअंतर्गत मागील साडेतीन वर्षांत राज्यात ११ हजार ८४० बालकांना हृदयाचे गंभीर आजार असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी ११ हजार ३३६ बालकांवर शासकीय योजनेतून हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – istock)
जगभरात हृद्यासंबंधित आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट ब्लॉकेजसारख्या गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. शरीरात जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलचा हृदयाच्या आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला पिवळा थर रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करतो, ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.
काही मुलाना जन्मतः हृदयदोष असतात, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंचे कार्य व्यवस्थित होत नाही. तर स्ट्रेप थ्रोट किंवा स्कार्लेट फीवरसारख्या संसर्गामुळे हृदयरोग होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाचे छिद्र आणि स्नायूंना नुकसान होऊ शकते. हा रोग प्रामुख्याने लहान मुलामध्ये होतो आणि त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना किंवा कोरोनरी धमन्यांना नुकसान होऊ शकते. तर इतरही कारणाने हृदयदोष बालकांना होऊ शकतात, असे हृदयरोग तज्ज्ञ सांगतात. बदलती जीवनशैली हेदेखील बालकांमध्ये हृदयदोष वाढण्याचे कारण आहे. त्याचबरोबर कोरोना साथीनंतर हे प्रमाण अधिक वाढले आहे.
बालकांवरील हृदयरोगावर अनेकदा औषधोपचार, शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय प्रक्रियेद्वारे उपचार केले जाऊ शकतात. काही हृदयरोगांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते, जसे की हृदय वाल्व बदलणे किवा हृदयातील दोष दुरुस्त करणे, काही वेळा इतर वैद्यकीय प्रक्रिया, जसे की कॅथेटरचा वापर करून हृदयरोगावर उपचार करणे आवश्यक असते.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी, शासकीय, निमशासकीय शाळांमधील लहान मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान आढळून आलेल्या आरोग्यविषयक समस्येवर सर्व प्रकारचे उपचार शासनाकडून पुरवण्यात येतात. महाराष्ट्रात १ एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान साडेतीन वर्षांत हृदयदोष असलेली ११ हजार ८४० बालके आढळून आली. त्यापैकी ११ हजार ३३६ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली तर ५०४ बालकांवरील उपचाराची प्रक्रिया सुरू आहे.