World Breastfeeding Week: स्तनपानामुळे लहान मुलांमधील लठ्ठपणा टळू शकतो का? जाणून घ्या सत्य
लहान मुलांमधील वाढता लठ्ठपणा ही सध्या जवळपास सर्वच पालकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. सुरुवातीच्या काही महिन्यांत बाळाला कशा प्रकारे दूध पाजले जाते, याचा पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यावर काही फरक पडतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो. स्तनपानाचा विचार केला, तर याचे उत्तर ‘हो’ असेच आहे. स्तनपानामुळे मुलांचे वजन अवाजवी वाढण्याचा धोका कमी होऊ शकतो. अर्थात, यामुळे वजन वाढणारच नाही अशी शंभर टक्के खात्री देता येत नाही, कारण मुलांच्या वजनावर इतरही अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. याविषयी डॉ शिल्पा आरोसकर, हेड ऑफ डिपार्टमेंट – पीडियाट्रिक्स आणि निओनॅटोलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
ज्या बाळांना स्तनपान दिले जाते, विशेषतः पहिल्या सहा महिन्यांसाठी किंवा त्याहून अधिक काळ, त्यांच्यामध्ये मोठे झाल्यावर लठ्ठपणा येण्याचा धोका काहीसा कमी असतो. बाळ जेवढ्या जास्त काळासाठी स्तनपान करेल, तेवढा हा फायदा अधिक काळ टिकून राहतो — पण त्यालाही एक ठराविक मर्यादा असते.
खाण्यावर स्वतःचे नियंत्रण: स्तनपान करताना बाळ प्रत्येक वेळी स्वतः ठरवते की त्याला किती दूध प्यायचे आहे, कारण बाटलीसारखे ते मोजलेले नसते. यामुळे त्यांना भूक लागल्याची आणि पोट भरल्याची जाणीव जास्त चांगली कळते — ही सवय पुढे जाऊनही त्यांच्या उपयोगाला येते.
नैसर्गिक हार्मोन्स: आईच्या दुधात असे हार्मोन्स असतात जे भूक नियंत्रित ठेवण्यास आणि शरीरात चरबी कशी साठवली जाते हे ठरवण्यास मदत करतात. फॉर्म्युला मिल्कमध्ये हे नैसर्गिक घटक नसतात.
कमी प्रथिने: आईच्या दुधात फॉर्म्युला मिल्कपेक्षा कमी प्रथिने असतात. लहान वयात जास्त प्रथिने मिळाल्यामुळे बाळाचे वजन वेगाने वाढू शकते आणि शरीरात चरबीच्या पेशी जास्त तयार होऊ शकतात.
पोटातील चांगले बॅक्टेरिया: स्तनपानामुळे बाळाच्या पोटात चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होते. हे बॅक्टेरिया पुढे जाऊन शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
स्तनपान नक्कीच फायदेशीर आहे, पण मुलांच्या वाढीसाठी फक्त तेवढीच एक गोष्ट पुरेशी नसते. मुले जसजशी मोठी होत जातात, तशा त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, शारीरिक हालचाली, पुरेशी झोप आणि घरातील वातावरण या सगळ्या गोष्टी त्यांच्या वजनावर मोठा परिणाम करतात. अनेकदा बाळाच्या पहिल्या काही महिन्यांतील दूध पाजण्याच्या पद्धतीपेक्षा या नंतरच्या सवयी जास्त महत्त्वाच्या ठरतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या माता दीर्घकाळ स्तनपान करतात, त्यांना आरोग्य सेवा किंवा चांगल्या आहाराची माहिती असण्याची शक्यता जास्त असते, ज्याचा थेट फायदा मुलाच्या आरोग्याला होतो. त्यामुळे मुलांचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी स्तनपान हा एक महत्त्वाचा भाग असला, तरी तो एकमेव उपाय नाही.
सारांश असा की, स्तनपानामुळे बालपणीच्या लठ्ठपणापासून नक्कीच चांगला बचाव होऊ शकतो. यामुळे बाळाला सुरुवातीपासूनच आहाराच्या चांगल्या सवयी लागतात आणि शरीरातील हार्मोन्स तसेच पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. पण, हे आरोग्याच्या संपूर्ण पुस्तकातील फक्त एक पान आहे. ज्या माता बाळाला फॉर्म्युला मिल्क देतात, त्यांनी अजिबात असा विचार करू नये की त्यांच्या मुलाचे वजन पुढे जाऊन वाढणारच आहे. मुलाचा चांगला आहार, नियमित शारीरिक हालचाली, पुरेशी झोप आणि घरातील प्रेमळ, सकारात्मक वातावरण या गोष्टीसुद्धा स्तनपानाइतक्याच, किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाच्या आहेत. नेहमीचा पण खूप महत्त्वाचा सल्ला, तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी दूध पाजण्याचा कोणता पर्याय सर्वात योग्य आहे, यासाठी आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घेणे सर्वोत्तम आहे.
Ans: काही संशोधनांनुसार स्तनपानामुळे पुढील आयुष्यात लठ्ठपणाचा धोका काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, हा एकमेव घटक नसून आहार, शारीरिक हालचाल आणि आनुवंशिकता यांचाही प्रभाव असतो.
Ans: जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) शिफारशीनुसार बाळाला जन्मानंतर पहिले ६ महिने केवळ आईचे दूध द्यावे. त्यानंतर पूरक आहारासह स्तनपान सुरू ठेवावे.
Ans: स्तनपानामुळे बाळाला आवश्यक पोषण मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होऊ शकतो.






