हायपरटेन्शनची समस्या वाढीला (फोटो सौजन्य - iStock)
बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण, धुम्रपान आणि दारूचे सेवन यामुळे सध्या २२ ते ३० वयोगटातील २५% तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या दिसून येत आहे. उच्च रक्तदाबासारख्या समस्येचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. उच्च रक्तदाबामुळे तरुणांमध्ये कमी वयात स्ट्रोक, हृदयविकार आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची पातळी संतुलित ठेवण्यासाठी नियमित चाचणी, संतुलित आहार, व्यायाम करण गरजेचं आहे. जेणेकरून भविष्यात या समस्या टाळता येऊ शकतात.
जेव्हा रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर रक्ताचा दाब खूप जास्त असतो तेव्हा त्यास उच्च रक्तदाब म्हणून ओळखले जाते. हे बऱ्याचदा कोणत्याही लक्षणांशिवाय विकसित होते, म्हणूनच त्याला “सायलेंट किलर” म्हणून संबोधले जाते. डोकेदुखी, चक्कर येणे, अंधुक दृष्टी, छातीत दुखणे किंवा थकवा ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. परंतु, उच्च रक्तदाबाबद्दल पुरेशी माहिती नसल्याने या आजाराचे पटकन निदान होत नाही. वेळीच निदान न झाल्यानं गुतांगुत वाढते. परंतु, सध्या तरूणांमध्ये उच्च रक्तदाबाच्या प्रकरणांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
काय सांगतात तज्ज्ञ
लीलावती रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सी. सी. नायर म्हणाले की, तणाव, करिअरची संबंधित वाढती स्पर्धा आणि वैयक्तिक आव्हानं, धूम्रपान आणि मद्यपानासारख्या सवयींसह तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाच्या समस्या वाढत आहेत. त्याहूनही एक चिंताजनक बाब म्हणजे उच्च रक्तदाब असलेल्या अनेक तरूणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. यामुळे नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
World Hypertension Day: मुलांमध्ये वाढतेय रक्तदाबाची समस्या, लक्षणे कोणती? काय उपचार कराल
अवयवांवर होतो परिणाम
जर रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही तर, कालांतराने तो इतर अवयवांवर परिणाम करु शकतो. तरुणांमधील उच्च रक्तदाबाची समस्या ही हृदयरोग, स्ट्रोक, दृष्टी कमजोर होणे आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकतो. रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या दर महिन्याला १० पैकी ८ तरूण रूग्णांना ताणतणाव किंवा धूम्रपानामुळे उच्च रक्तदाबाची समस्या असल्याचं आढळून येत आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठाचे सेवन मर्यादित करणे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळणे, धूम्रपान तसेच मद्यपानाचे व्यसन सोडणे, नियमित व्यायाम करणे आणि योगा आणि मेडिटेशन सारख्या पर्यायाने तणावाचे व्यवस्थापित करणे गरजेचे आहे.
रक्तदाब पातळी तपासणे महत्त्वाचे
नियमित रक्तदाबाची तपासणी करावी
डॉ. नायर पुढे म्हणाल्या की, तरुणांनी दर महिन्याला त्यांचे रक्तदाबाची पातळी तपासणे गरजेचे आहे. विशेषतः जर कौटुंबिक इतिहास असलेल्यांनी वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. वेळीच निदान भविष्यातील गुंतागुंत टाळण्यास आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करू शकते. उच्च रक्तदाब ही आता केवळ प्रौढांमधील समस्या राहिलेली नाही. योग्य जीवनशैलीची निवड आणि नियमित आरोग्य तपासणीसह उच्च रक्तदाबाच्या समस्येला रोखता येऊ शकते.
व्यसन ठरत आहेत कारणीभूत
विविध व्यसनांमुळे होतोय त्रास
मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील जनरल फिजिशियन डॉ. छाया वजा म्हणाल्या की, तणाव, धूम्रपान आणि अल्कोहोलचे व्यसन तरुणांमध्ये उच्च रक्तदाबासारख्या समस्येस कारणीभूत ठरत आहे. उच्च रक्तदाबाची समस्या ही २२-३० वयोगटातील तरुणांमध्येही हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि दृष्टीवर परिणाम करु शकते. जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्याने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत, पौष्टिक आहाराचे सेवन करावे, योगा आणि ध्यान करून तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करणे, दररोज व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि नियमितपणे रक्तदाबाचे निरीक्षण करणे गरजेचे आहे.