
मुंबईमध्ये ४० अंशांपुढील दिवस वाढणार! २०४० पर्यंत ४० अंश पार करणाऱ्या दिवसांत होणार मोठी वाढ
मुंबईत पुढील दीड दशकात उष्णतेच्या लाटांचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता असून ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असणाऱ्या दिवसांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचा इशारा हवामान प्रक्षेपण अहवालातून देण्यात आला आहे. अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या ‘क्लायमेट प्रोजेक्शन्स व्हर्जन २.०’ अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, १९६० च्या दशकात वर्षभरात ४० अंशांपेक्षा जास्त तापमानाचे दिवस जवळपास नगण्य होते. मात्र २०३६ ते २०४० या कालावधीत मध्यम उत्सर्जनाच्या (एसएसपी२-४.५) परिस्थितीत हे प्रमाण वर्षाला १.९५ दिवसांपर्यंत पोहोचेल. उच्च उत्सर्जनाच्या (एसएसपी५-८.५) परिस्थितीत ही संख्या २.६१ दिवसांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे २०३१ नंतर दोन्ही परिस्थितींमधील फरक स्पष्टपणे दिसू लागणार आहे.(फोटो सौजन्य – AI)
२०३६-४० मध्ये उच्च उत्सर्जनाच्या परिस्थितीत ४० अंशांवरील दिवसांचे प्रमाण मध्यम उत्सर्जनाच्या तुलनेत सुमारे ३४ टक्क्यांनी अधिक राहील.तज्ज्ञांच्या मते, उष्णतेच्या लाटा वाढल्यास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, बांधकाम कामगार आणि खुल्या वातावरणात काम करणाऱ्या व्यक्तीना अधिक धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे शहर पातळीवर उष्णता कृती आराखडे, हरित क्षेत्रांची वाढ आणि शीतल आश्रयस्थळांची उभारणी यावर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.
‘तापमान वाढ व्हावी असे घडवले जात आहे, त्यात नवीन काही नाही. आपल्याला प्रकल्प हवे असून सगळे प्रकल्प तापमान वाढवतात, जंगले झाडे तोडतात, कॉक्रिटीकरण वाढवतात. स्थानिक पातळीवर कार्बन उत्सर्जन वाढवले जात आहे. मोटारींना प्रोत्साहन दिले जातेय. हे मुंबईतच नव्हे तर, सगळीकडे घडवले जातेय. मग तापमान वाढणारच, १९९५ सालपासून सुरू आहे. अनेक मजल्यांच्या इमारती म्हणजे विकास आहे का? पाणथळ जागा, मोकळ्या जागा, मंगरुज तोडली जात आहेत. तापमान वाढतेय हे फक्त सांगून चालत नाही, असे मत गिरीश राऊत, भारतीय जीवन व पृथ्वी रक्षण चळवळ यांनी व्यक्त केले आहे.