मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये येण्याचा इशारा दिला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
नाशिक : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार आंदोलन सुरु आहे. सध्या जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरुन असून आज त्यांच्या दौऱ्याचा समारोप झाला. मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरु असून सध्या ते नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये भव्य रोड शोनंतर जरांगे पाटील यांनी यात्रेचा समारोप केला आहे. मात्र त्यांच्या या यात्रेमध्ये मोठी चोरी झाल्याची घटना घडली आहे. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीतून 5 लाख 4 हजारांचा सोन्याचा ऐवज लुटला गेला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
चोरट्यांनी मारला हात
मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सध्या नाशिकमध्ये आहे. त्यांच्या या रॅलीला मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव उपस्थित असून आरक्षणासाठी त्यांनी हा विराट मोर्चा काढला आहे. मात्र या शांतता रॅलीमध्ये काही चोर देखील आपला हात साफ करुन घेत आहे. लाखोंची गर्दी असल्याचा फायदा घेत हे चोरटे लाखो रुपयांची चोरी करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीतून पाच लाख चार हजारांचा सोन्याचा ऐवज लुटलाय. चोरट्यांनी रॅलीत शिरून नागरिकांच्या सोन्याची चैन, मंगळसूत्र चोरले. मोबाईलसह अनेकांचे पाकीट देखील चोरट्यांनी लांबविले. नाशिकच्या पंचवटी व आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जरांगे पाटलांची विधानसभेसाठी चाचपणी
मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरक्षण न दिल्यास त्यांनी निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील हे सर्व जागांवर उमेदवार उभा करणार असून त्यासाठी चाचपणी देखील सुरु झाली आहे. मराठा बाधव असलेल्या इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मागवण्यात आलेले आहे. मनोज जरांगे पाटील स्वतः त्यांची मुलाखत घेणार असून उमेदवारी जाहीर करणार आहे. हा महायुतीला आणि महाविकास आघाडीला मोठा फटका देणारा निर्णय होऊ शकतो. आरक्षण न दिल्यास विधानसभेसाठी जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.