लोणंद : लोणंद पाडेगांव (ता.फलटण) येथील नेवसे वस्तीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या उत्तर प्रदेशमधील पाच जणांच्या टोळीला लोणंद पोलिसांनी गजाआड (Five Peoples Arrested) केले. त्यांच्याकडून १ लाख ५४ हजार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात लोणंद पोलिसांना यश मिळाले.
मन्मद अली रंमजान (वय ३२), मोहम्मद इब्राहिम मोहिद (वय ३७), फरदिंन बहादर खान (वय २०), आलम सरुद खान (वय २२), शिवा संत भगवानदा कनेजिया (वय ३५ सर्व रा. उत्तर प्रदेश सध्या रा. बाळू पाटलाचीवाडी ता. खंडाळा) अशी आरोपींची नावे आहेत.
लोणंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरुन, पाडेगांव (ता.फलटण) वस्ती या ठिकाणी १० जून रोजी गस्त घालत असताना पाच संशयित इसमांच्या हालचालीवरुन गस्तीवर असणाऱ्या लोणंद पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ते सर्वजण दरोडा टाकण्यांच्या तयारीत असल्याचे समोर आले. त्यानंतर लोणंद पोलिसांनी या पाचही जणांना लोणंद पोलीस ठाण्यांत आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली.
अटक आरोपींकडे अधिक चौकशी करीत माहिती मिळवली असता त्यांनी यापूर्वी फलटण, बारामती येथील शेतकऱ्यांच्या विहिरीतील तीन विद्युत मोटारी १ एचपी पंप, पाण्यांचे वाल असा एकूण सुमारे ५४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात लोणंद पोलिसांना यश आले. एवढेच नव्हे तर लोणंद फलटण ग्रामीण वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्यांच्यावर नऊ वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सर्व पोलिस कर्मचारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.