टेंभुर्णी : पुणे जिल्ह्यात पावसाने मागील आठवड्यापासून विश्रांती घेतल्याने दौंड येथील उजनीच्या जलसाठ्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट झाली असून, संथगतीने उजनी पाणी साठ्यात वाढ होत आहे. बुधवार दि. ९ रोजी सायंकाळी सहा वाजता दौंड येथून २ हजार ९९९ क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत होता. उजनी टक्केवारी १२.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या दहा दिवसात ७ टिएमसी पाणीसाठा वाढला आहे.
जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात भिमा खोऱ्यात झालेल्या पावसामुळे उजनी पाणी पातळीत वाढ होत गेली होती. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्य भरासह भीमा खोऱ्यातही पावसाने उघडीप दिल्यामुळे उजनीत जमा होणाऱ्या विसर्गात घट होत गेली. १ ऑगष्टपासून दौंड येथून जमा होणाऱ्या विसर्गात कमी अधिक प्रमाणात घट होत गेली. मात्र गेल्या पाच दिवसात कमालीची घट झाली आहे. चालू हंगामात २८ जुलै रोजी सर्वाधिक २८ हजार क्युसेक विसर्गाने उजनीत पाणी आले. त्यानंतर कमी अधिक विसर्ग होत गेला. ९ जुलै रोजी उजनी या हंगामातील सर्वाधिक वजा ३६.१९ पर्यंत पाणीसाठा खलावला होता. गेल्या एका महिन्यात उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ४८.३१ टक्केने वाढली आहे. तर २६ टिएमसी पाणीसाठा एका महिन्यात जमा झाला आहे. सध्या उजनी धरणात एकूण ७०.१७ टिएमसी पाणीसाठा असून ६.५१ टिएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात २१८ मिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पावसाकडे शेतकऱ्यांचे डाेळे
मागील वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी उजनीचा पाणीपाठा कमी आहे. चालू हंगामात एक दोन वेळा मोठा पाऊस पडला परंतु यामुळे विहीरी, कुपनलिका यांच्या पाणीपातळीत म्हणावी अशी वाढ नाही. यामुळे शेकऱ्यामध्ये कमालीची चिंता आहे. पुणे जिल्ह्यात व भीमा खोऱ्यात पडणाऱ्या पावसाकडे शेतकऱ्यांचे डाेळे लागले आहेत.
लाभक्षेत्रातील ऊस लागवडीवर परिणाम
उजनीचा संथगतीने होत असलेल्या पाणी पातळीमुळे सोलापूर जिल्ह्यासह लाभक्षेत्रातील ऊस लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. उजनी धरणात पुरेशा प्रमाणात आवक झाल्यास ऊस लागवडीसाठी वेग येणार आहे. तर आवक घटल्यामुळे आडसाली लागवडीचा हंगाम धोक्यात आला असून परिसरातील शेतकरी व नागरिक दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.






