
फोटो सौजन्य AI
रविवारी (दि. २५) दुपारी माळेगाव येथील हॉटेल शिवकृपा येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारताना शेख यांना पकडण्यात आले. या कारवाईमुळे वनविभागातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची कोऱ्हाळे खुर्द येथे चार हेक्टर शेतजमीन आहे. पावसामुळे शेतातील माती नीरा नदीत वाहून गेल्याने त्यांनी नदीपात्रातील माती शेतात टाकण्याचे काम सुरू केले होते. मात्र, २६ सप्टेंबर रोजी वनपाल जहीर शेख यांनी हे काम थांबवले.
संबंधित जागा वनविभागाच्या मालकीची असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. मातीचा भराव सुरू ठेवण्यासाठी शेख यांनी स्वतःसह सहकारी भूमरे मॅडम यांच्यासाठी एकूण १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मागणी केलेल्या १० हजार रुपयांपैकी चार हजार रुपये २६ सप्टेंबर रोजीच स्वीकारण्यात आले होते. उर्वरित सहा हजार रुपये दिल्यानंतरच मातीचा भराव सुरू ठेवण्यास सांगण्यात आले. यानंतर तक्रारदाराने पुणे एसीबीकडे धाव घेतली.
२३ ऑक्टोबर रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी शेख यांनी यापूर्वी चार हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित सहा हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती एसीबीने दिली.
एसीबीच्या पथकाने रविवारी माळेगाव येथील हॉटेल शिवकृपा येथे सापळा रचला. दुपारी २.१७ वाजता तक्रारदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारताना वनपाल जहीर शेख यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७ अन्वये माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली ही कारवाई करण्यात आली.
शासकीय काम करून देण्यासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे. सरकारी कार्यालयांतील लाचखोरीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचे महत्त्व या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.