(Photo - Social Media)
अकलूज : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC) आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख सहकार नेते आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. (Solapur DCC Bank Election)
या बैठकीत माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मांडलेली भूमिका ही संपूर्ण जिल्ह्यासाठी चर्चेची आणि सकारात्मक दिशादर्शक ठरणार आहे.
बैठकीत बोलताना रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, “जिल्हा मध्यवर्ती बँक ही केवळ एक बँक नाही, तर ती लाखो शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. माझ्या शेतकरी बांधवाच्या शेतातील पीक याच बँकेच्या कर्जावर उभे राहते. त्यामुळे या निवडणुकीकडे कोणत्याही एका राजकीय पक्षाची प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून न पाहता, शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्वांनी एकत्रितपणे काम करणे ही काळाची गरज आहे.”
सहकार चळवळीने महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोलाचे योगदान दिले आहे. विठ्ठलराव शिंदे, अभयसिंह मोहिते-पाटील यांच्यासारख्या दिग्गजांनी या सहकाराचा पाया रचला आहे. या गौरवशाली परंपरेचे जतन करण्यासाठी राजकीय मतभेद, पक्षभेद बाजूला ठेवून जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एका छताखाली यावे, हीच आमची प्रामाणिक भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक बळकट, पारदर्शक आणि शेतकरी हितैषी करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे आश्वासनही रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिले. त्यांच्या या सर्वसमावेशक भूमिकेचे जिल्हाभरातील सहकार क्षेत्रातून स्वागत होत आहे. बँक निवडणुकीत राजकारणापेक्षा सहकार्याला प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, निवडणुकीची घोषणा होताच भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री *जयकुमार गोरे* यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि समविचारी नेत्यांची स्वतंत्र बैठक झाल्याचे समजते. त्या बैठकीतही DCC बँक निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली.
आता रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सर्वपक्षीय एकजुटीचे आणि बिनविरोध निवडणुकीचे जे सकारात्मक आवाहन केले आहे, त्याला भारतीय जनता पार्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे हे कसा प्रतिसाद देतात? राजकीय स्पर्धा बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी सर्व नेते एकत्र येतात का? याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जर सर्व नेते एकत्र आले तर सोलापूर DCC बँक ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बँक म्हणून अधिक ताकदीने उभी राहील, अशी चर्चा आता सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.






