फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अमरावती : लोकसभा निवडणुकीपासून महायुती व बच्चू कडू यांच्यामध्ये बिनसलं आहे. अमरवातीमध्य़े भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाले. विरोधानंतर देखील भाजपने उमेदवारी मागे न घेतल्यामुळे प्रहार संघटनेचा देखील अमरावतीमध्ये उमेदवार उभा केला. बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना महायुतीच्या उमेदवाराविरोधात उभे केले. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला. नवनीत राणा पडल्यामुळे रवी राणा आक्रमक झाले असून त्यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केले आहे. बच्चू कडू यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे.
रवी राणा यांचे गंभीर आरोप
नवनीत राणा यांच्या पराभवानंतर रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला. बच्चू कडू यांना महाविकास आघाडी मदत करत असल्याचा गंभीर आरोप राणा यांनी केला आहे. रवी राणा म्हणाले, ‘अचलपूरच्या आमदारांना रसद पोहोचवण्यात आली. त्यांचं नावच तोडीबाज, वसुलीबाज आणि सुपारी घ्यायचं काम करतात. मातोश्रीवरून रसद घेणे, अनेक नेत्यांकडून वसूल करणे. नवनीत राणांना पाडण्यासाठी उमेदवार उभा करणे, या रणनीती आखण्यात आल्या. त्यांच्या मतदारसंघात त्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे,’ अशी टीका रवी राणांनी बच्चू कडूंवर केली आहे.
बच्चू कडूंचे चोख प्रत्युत्तर
बच्चू कडू यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. आमदार कडू म्हणाले, निवडणुकीवेळी शिंदेंचा उमेदवार भाजपाने ठरवला. त्यामुळे भाजप उमेदवार ठरवणार ही नवीन पद्धत आली आहे. हे म्हणजे नाक दाबून बुक्क्यांचा मार आहे. अजितदादांबरोबरही असंच झालंय. दोन उसने उमेदवार त्यांना दिले. असा युती धर्म असतो का? एकनाथ शिंदेंच्या साथीने युतीचं सरकार सुरळीत चालू होता. परंतु, शिंदेंना शह देण्याकरता तुम्ही अजित दादांना घेतलं आणि अजित दादांना हाती घेऊन शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न केला. अधिकचं राजकारण लोकांना पटत नाही.” असा घणाघात बच्चू कडू य़ांनी करत महायुतीवरच्या कार्यावर आक्षेप घेतला आहे.
पुढे त्यांनी रवी राणा यांना खडेबोल सुनावले. राणांच्या आरोपावर उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, “खरं तर नवनीत राणा यांच्या पराभवाचा कट हा युवा स्वाभीमानी पक्षाचा आहे. नवनीत राणा जेव्हा खासदार होत्या, तेव्हा रवी राणा हे कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे अंतर्गत कलहामुळे त्यांचा पराभव झाला. आमचा काहीही वाद नाही. रवी राणा यांनी फक्त तोंड सांभाळलं असतं तरी नवनीत राणा निवडून आल्या असत्या” असे प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिले. तसेच मातोश्रीवरुन रसद पुरवली असल्याच्या आरोपवर देखील न्यायालयामध्ये जाणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.