जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका यापूर्वीच मांडली होती. त्यानंतर बिनविरोध निवडणुकीच्या हालचालींना वेग आला. रविवारी संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दिशेने प्राथमिक सहमती झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीनंतर आता तालुकानिहाय चर्चा करून अंतिम तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप
मात्र, या बैठकीला राम शिंदे उपस्थित नव्हते. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका काय असणार, हा प्रश्न उपस्थित झाला होता. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना बिनविरोध निवडणुकीला विरोध नसल्याचे सांगितले; परंतु सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच निर्णय झाला पाहिजे, असे बजावले. “सर्वांनी एकत्र प्रयत्न केले तर चांगला संदेश जाईल. पण कोणी स्वतःचा स्वतंत्र अजेंडा चालविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते गैर आहे. जिल्हा बँक ही सर्वांची कामगिरी आहे आणि तिचे संचालक मंडळही सर्वांना सोबत घेऊन उभे राहिले पाहिजे,” असा स्पष्ट संदेश शिंदे यांनी दिला.
सध्या जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राजकीय संघर्ष पेटविण्याऐवजी सामंजस्याने मार्ग काढण्याची गरज आहे, असे शिंदे यांनी सांगितले. जिल्हा बँक ही केवळ राजकीय सत्तेचे केंद्र नसून शेतकरी, ठेवीदार आणि कर्जदारांशी जोडलेली महत्त्वाची सहकारी संस्था आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली तर सहकार क्षेत्रात सकारात्मक संदेश जाईल, अशी भूमिका सर्वपक्षीय बैठकीतही मांडण्यात आली होती. मात्र, बिनविरोधचा निर्णय घेताना कोणाला किती जागा, कोणत्या गटाला किती प्रतिनिधित्व आणि इच्छुकांना कशा पद्धतीने सामावून घेतले जाणार, हे प्रश्न आता महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे बिनविरोधचा नारा देणे सोपे असले तरी प्रत्यक्ष जागावाटपाच्या वेळी खरी कसोटी लागणार आहे.
संगमनेर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बँकेच्या २१ संचालकपदांपैकी काही जागांवर सर्वानुमते उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली. उपलब्ध वृत्तांनुसार सात जागांबाबत बिनविरोधचा फॉर्म्युला ठरविण्याच्या दिशेने चर्चा झाली असून उर्वरित सेवा सोसायटी मतदारसंघातील १४ जागांसाठी स्वतंत्र पॅनलची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. थोरात आणि सुजय विखे पाटील यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी देण्याबाबतही वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, या चर्चेतील अंतिम स्वरूप उमेदवारी अर्ज आणि पुढील तालुकानिहाय चर्चेनंतरच स्पष्ट होणार आहे.
याच बैठकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर चर्चेला उधाण आले आहे. दीर्घकाळ राजकीय विरोधात राहिलेले थोरात आणि विखे गट बँकेच्या निवडणुकीसाठी एका व्यासपीठावर आल्याने सहकार क्षेत्रातील समीकरणांमध्ये मोठी हालचाल झाल्याचे चित्र आहे. परंतु, या प्रक्रियेत प्रत्येक तालुका आणि प्रत्येक इच्छुक गटाला विश्वासात घेणे आवश्यक आहे. अन्यथा बिनविरोधची चर्चा एका बाजूला आणि प्रत्यक्ष निवडणुकीची तयारी दुसऱ्या बाजूला, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्वतः उमेदवारी करणार का, या प्रश्नावर राम शिंदे यांनी थेट अंतिम घोषणा केली नसली तरी आपल्या सक्रिय सहभागाचे स्पष्ट संकेत दिले. गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतच आपण जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदविण्याबाबत सूचक भूमिका मांडली होती, असे त्यांनी सांगितले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील दोन विविध कार्यकारी संस्थांनी आपल्या नावाने ठराव पारित केले आहेत. तसेच तालुका प्रतिनिधींच्या मतदार यादीत आपले नाव असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आपण निवडणुकीच्या प्रक्रियेत सक्रिय असल्याची चर्चा होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी चेअरमन आणि अनुभवी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्यामुळे निवडणुकीत पॅनल उभे करण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही बोलले जात होते. त्यावर शिंदे यांनी सहकार क्षेत्रात सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावे लागते, हे स्पष्ट केले. “मी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे यापूर्वीच सांगितले आहे. माझ्या नावाने ठराव झाले आहेत. मतदार यादीतही माझे नाव आहे. त्यामुळे माझ्या सक्रियतेची चर्चा होणे गैर नाही. मात्र सहकारात सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावे लागते,” असे शिंदे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या भवितव्याबाबत शिंदे यांनी भूमिका स्पष्ट करताना बँक टिकली पाहिजे आणि सक्षम झाली पाहिजे, यावर भर दिला. सर्वसामान्य शेतकऱ्याला बँकेचा फायदा झाला पाहिजे. त्याचबरोबर सहकारी क्षेत्रातील इतर संस्थांनाही बँकेची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. सहकारातील जुन्या प्रथा आणि परंपरा पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी बँकेच्या निवडणुकीकडे केवळ राजकीय प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहू नये, असा संदेश दिला. बँकेच्या संचालक मंडळात विविध घटकांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. कोणत्याही एका गटाचा किंवा व्यक्तीचा प्रभाव निर्माण करण्याऐवजी बँकेच्या हिताला केंद्रस्थानी ठेवले पाहिजे, हा त्यांच्या भूमिकेचा मुख्य सूर होता.
बिनविरोध निवडणुकीच्या प्रक्रियेत आपली भूमिका काय असेल, याबाबत बोलताना शिंदे यांनी आपल्याकडेही अनेक इच्छुक येत असल्याचे सांगितले. मात्र, जिल्ह्याच्या पातळीवर सर्वमान्य निर्णय झाला तर त्यानुसार पुढे जाण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
“माझ्याकडेही अनेक लोक काम करीत आहेत. त्यांनाही मी सांगत आहे की, एकदा जिल्ह्याचा निर्णय झाला आणि सर्वांच्या सहमतीने एखादी गोष्ट ठरली तर त्यानुसार पुढे जावे लागेल,” असे ते म्हणाले. मात्र, थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीतील अंतिम धोरण अद्याप आपल्यापर्यंत आलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बैठकीत नेमके काय ठरले, याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट करता येईल, असे त्यांनी सांगितले.
Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन
संगमनेरच्या बैठकीनंतर आता तालुकानिहाय बैठका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रक्रियेत सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा होणे आणि बैठकीतील निर्णयाचा स्पष्ट संदेश सर्व इच्छुकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे शिंदे यांनी सांगितले. “ज्यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली त्यांनी सर्वांशी सुसंवाद साधून निवडणूक पुढे नेली पाहिजे. कालच्या बैठकीचा अजेंडा किंवा धोरण अजून माझ्यापर्यंत आलेले नाही. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच पुढे जाणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे राम शिंदे यांनी बिनविरोधला विरोध न करता ‘सर्वांना सोबत घ्या’ आणि ‘स्वतंत्र अजेंडा नको’ असा स्पष्ट संदेश दिल्याने आता थोरातांच्या नेतृत्वाखालील समन्वय प्रक्रियेला शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे इच्छुक उमेदवार आणि विविध गटांना समाधानकारक प्रतिनिधित्व देण्याचे आव्हानही समोर आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी ‘बिनविरोध’च्या पडद्यामागे जागावाटपाचा खरा सामना रंगणार का, सर्वांना सोबत घेऊन तडजोडीचा फॉर्म्युला निघणार का आणि राम शिंदे यांची पुढील भूमिका काय राहणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






