
युवा शेतकऱ्यांसाठी रोजगाराची नवी दिशा; प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्रांसह शासकीय योजनांची माहिती
हे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था, तांत्रिक भवन, आशीर्वाद कॉलनी, कानडेमळा, सारसनगर, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणादरम्यान सहभागी प्रशिक्षणार्थींना पुढील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले:
शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसायाची सुरुवात कशी करावी
पशुपालन व्यवसायाचे नियोजन व व्यवस्थापन
उत्पादनाची थेट विक्री करण्याचे मार्ग
बँक कर्ज प्रक्रिया
विविध शासकीय अनुदान व योजनांची माहिती
व्यवसायातील आर्थिक नियोजन आणि उत्पन्न वाढीचे मार्ग
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण प्रमाणपत्र तसेच अनुभव प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या प्रमाणपत्रांचा उपयोग भविष्यात बँक कर्ज प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या प्रशिक्षणाचे नियोजन व अंमलबजावणी मुख्य कार्यकारी डॉ. विकास शिंगाडे, प्रकल्प अधिकारी राखी देसले आणि प्रकल्प अधिकारी केशव वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रशिक्षणात सहभागी झालेल्या युवक, महिला आणि शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे कौशल्याधारित प्रशिक्षण ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराला चालना देणारे असल्याचे सांगितले. पशुपालन व्यवसायातून आर्थिक स्वावलंबन मिळवण्यासाठी आणि शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केले.