
फोटो सौजन्य: iStock
छत्रपती संभाजीनगर महामार्गाची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे.
नगर ते इमामपूर परिसरापर्यंत काही ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले असले, तरी धनगरवाडी, महावितरण चौक आणि मारुती मंदिर (खिंड) परिसरातील रस्त्यांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. घाटातील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविवारी सायंकाळी पांढरीपुल घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
Ahilyanagar News: दिल्ली स्फोटानंतर शनिशिंगणापूरमध्ये तपासणी मोहीम सुरु
महामार्ग दुरुस्तीचे काम सलगपणे न होता टप्प्याटप्याने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची एक बाजू नेहमीच उखडलेली राहते आणि दुसरीकडे वाहतुकीसाठी अरुंद मार्ग उरतो. परिणामी, अवजड वाहनांचे नादुरुस्त होणे, वाहतुकीची कोंडी आणि अपघात यांची साखळी सतत सुरू आहे. नागरिकांचा सवाल आहे की, “घाटातील सर्वाधिक धोकादायक खड्डे आधी बुजविले जाणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे?”
इमामपूर घाटातील रस्त्यांवरील खोल खड्डे अत्यंत धोकादायक ठरत असून, अनेक अपघातांची कारणीभूत ठरले आहेत. स्थानिक नागरिकांनी या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. पांढरीपुल चौक हा चार तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे वाहतूक कोंडी आणि अपघात हे आता नित्याचे झाले आहेत.
प्रशासनाकडून रस्त्यांची योग्य देखभाल आणि नियोजनपूर्वक दुरुस्ती न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.