Ahilyanagar News: दिल्ली स्फोटानंतर शनिशिंगणापूरमध्ये तपासणी मोहीम सुरु
सोमवारी दिल्ली झालेल्या स्फोटानंतर देशातील अनेक महत्वाची धार्मिक स्थळं हाय अलर्टवर गेली आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच या धक्कादायक घटनेबद्दल तपास मोहीम सुरु झाली आहे.
दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा पोलिस प्रशासनाने येथे सुरक्षा यंत्रणा अधिक कडक केली आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता देवस्थान परिसरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि भाविकांच्या बॅगा, वस्तूंची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी दिवस-रात्र गस्त घालत आहेत. मंदिर परिसरात येणाऱ्या संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा वस्तूंवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, धातू शोधक यंत्रे आणि बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक विभाग आणि विशेष पथकांचा यात समावेश आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता, शिस्त राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांसाठी मार्गदर्शन केंद्र, नियंत्रण कक्ष आणि आवश्यक सुविधा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. ट्रस्ट सदस्यांनी सांगितले की, “भाविकांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही सतत पोलिस प्रशासनाशी संपर्कात आहोत. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, त्यामुळे भाविकांनी निश्चिंतपणे दर्शनासाठी यावे.”
राज्यभरातील इतर महत्त्वाच्या देवस्थानांप्रमाणेच शनिशिंगणापूरमध्येही सतर्कता आणि सुरक्षा तयारी उच्चस्तरीय करण्यात आली आहे. भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ट्रस्ट व पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे केले आहे.






