(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
AI Video: मोहोळ, (वा.) डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असून, त्याचे काही दुष्परिणामही समोर येत आहेत. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’च्या माध्यमातून तयार होणाऱ्या व्हिडीओंचा वाढता प्रभाव लहान मुलांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. एआय निर्मित आणि प्रत्यक्ष चित्रित केलेल्या व्हिडीओंमधील फरक ओळखणं मुलांना कठीण जात असल्याने आभासी जगाचा त्यांच्या मानसिकता, वर्तन आणि सुरक्षिततेवर परिणाम होत असल्याचं चित्र शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे.
एआय व्हिडीओंमध्ये अतिरंजित आणि आकर्षक प्रसंग दाखवले जातात. हे व्हिडीओ मुलांना सहज भुरळ घालतात. त्यामुळे काही मुले अशा आभासी सामग्रीच्या आहारी जाण्याची शक्यता वाढत आहे. प्रत्यक्ष जगापेक्षा एआयच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडीओ अधिक आकर्षक वाटू लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
काही मुले एआय व्हिडीओंमधील प्रसंग खरे समजून त्यांचं प्रत्यक्ष जीवनात अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा सामग्रीचा मुलांच्या वर्तनावर आणि सुरक्षिततेवरही परिणाम होऊ शकतो.
AI Videos इतके Real दिसतात… मग ओळखायचं कसं? – Navarashtra
एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या व्हिडीओंमध्ये वास्तवाशी कोणताही संबंध नसलेली दृश्ये, व्यक्ती किंवा घटना अत्यंत हुबेहूब पद्धतीने दाखवता येतात. त्यामुळे मुलांनी सोशल मीडियावरील कोणताही व्हिडीओ पाहून त्यावर तातडीने विश्वास ठेवू नये, यासाठी त्यांना डिजिटल साक्षरतेचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे.
व्हिडीओ खरा आहे की एआय निर्मित, याबाबत शंका असल्यास पालक किंवा जाणकार व्यक्तींची मदत घेण्याची सवय मुलांना लावणे गरजेचे आहे.
AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा …
“एआय तंत्रज्ञान उपयुक्त आहे; मात्र त्याचा वापर मर्यादित आणि सुरक्षित पद्धतीने करणे गरजेचे आहे. मुलांनी तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान मिळविण्यासाठी करावा; मात्र स्वतःची बुद्धी आणि सर्जनशीलता एआयच्या हवाली करू नये. पालकांनी योग्य देखरेख ठेवून मुलांना वास्तवाचे भान देणे ही काळाची गरज आहे,” असं मत अॅड. गणेश मोरे-कुरणवाडीकर यांनी व्यक्त केलं.
एआय निर्मित व्हिडीओ पाहताना मुलांशी संवाद साधणं आवश्यक आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक व्हिडीओ सत्य किंवा प्रत्यक्ष घटनेवर आधारित नसतो, हे पालकांनी मुलांना समजावून सांगावं.
मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवण्यासोबतच त्यांना मैदानी खेळ, वाचन आणि प्रत्यक्ष सामाजिक संवादासाठी वेळ देणं गरजेचं आहे. संशयास्पद किंवा अतिरंजित सामग्री दिसल्यास ती पुढे शेअर न करता तिची सत्यता तपासण्याची सवय मुलांना लावावी.
व्हिडीओतील कृतींचं अनुकरण धोकादायक
एआय व्हिडीओंमधील अनेक कृती प्रत्यक्षात शक्य नसतात किंवा त्यामध्ये धोका असू शकतो. मात्र, या कृतींचे परिणाम लक्षात न आल्याने काही मुले त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
एआय सामग्रीचा अतिवापर मुलांच्या नैसर्गिक विकासावरही परिणाम करू शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाइमवर लक्ष ठेवणं, त्यांच्या वयाला अनुरूप सामग्री निवडणं आणि वास्तव व आभासी जगातील फरक समजावून सांगणं आवश्यक आहे.






