
ajit pawar (फोटो सौजन्य: social media)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काही क्षणापूर्वी विमान अपघातात मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर आली. आज सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. एकूण त्यांच्यासह ६ जण प्रवास करत होते. बारामतीमध्ये लॅडिंगदरम्यान ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि कार्यकर्त्यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघात स्थळी मोठी गर्दी झाली. ही दुर्घटना अजूनही गळ्याच्या खाली उतरत नाही आहे. या घटनेने राजकीय क्षेत्रातच नाही तर संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. संपूर्ण महाराष्ट्र्रात खळबळ उडाली आहे. अत्यंत दुर्दैवी ही घटना घडली.
त्यांचा राजकीय प्रवास हा महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा, आक्रमक आणि अनेकदा अनपेक्षित वळणांनी भरलेला राहिला आहे. स्पष्ट आणि ठाम बोलण्यासाठी ओळखले जाणारे अजित पवार संपूर्ण महाराष्ट्रात ‘अजित दादा’ म्हणून परिचित आहेत. समर्थकांसाठी ‘अजित दादा’ तर विरोधकांसाठी एक राजकीय कोडे असलेले हे व्यक्तिमत्त्व, शरद पवार यांचे पुतणे म्हणून राजकारणात दाखल झाले. मात्र काळानुसार त्यांनी स्वतःच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली. सत्ता, संघर्ष आणि धाडसी निर्णयांनी भरलेला हा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेचा विषय राहिला आहे. चला, जाणून घेऊया अजित पवार यांचा हा राजकीय प्रवास नेमका कसा घडत गेला.
अजित आशाताई अनंतराव पवार (२२ जुलै १९५९) यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सहकार आणि स्थानिक राजकारणातून (पुणे जिल्हा) केली. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.
राजकारणात मजबूत पकड
अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना (1999) झाल्यापासून ते पक्षात महत्त्वाची भूमिका बजावत होते. ते बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मजबूत पकड ठेवून होते.
१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले, नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले. अजित दादा त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९, २०२४ असे सलग सात वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले.
पुण्याचे पालकमंत्री
महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. २००४ साली आघाडी सरकार (कॉंग्रस + राष्ट्रवादी काँग्रेस + इतर) पुन्हा सत्तेवर आले, तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. २००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.
अजित पवार यांचा बंड
२०१९ मध्ये, त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी दावा केला की त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु ३ दिवसात दोघांनी राजीनामा दिला. २०२३ मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले. 2023 मधील हे बंड केवळ सत्ता बदल नव्हतं, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाची दिशा बदलणारा क्षण ठरला. अजित पवारांनी पहिल्यांदाच काका शरद पवारांच्या विरोधात जाऊन पूर्ण ताकदीने स्वतंत्र राजकीय खेळी केली.
अजित पवारांना मोठा धक्का! बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर; मुंबईत होणार पक्षप्रवेश
महाराष्ट्रातील महायुती गठबंधनाने २०२४ मध्ये झालेल्या विधानसभाच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले. ज्यात BJP, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार नेतृत्वातील NCP (पवार गट) यांचा समावेश होता. यांच्या समन्वयात सरकाराची स्थापना झाली. 5 डिसेंबर 2024 रोजी, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याच्या पदावर शपथ घेतले आणि त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी महायुती सरकारमध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावली.
राजकारणात 45 वर्षांचा अनुभव
महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास 45 वर्षांचा अनुभव अजित पवार यांना आहे. त्यांनी अनेकदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्याकडे एक कष्टाळू, शिस्तप्रिय आणि विकासकामांवर भर देणारा नेता म्हणून ओळख आहे. विद्यार्थी चळवळीपासून उपमुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा सातत्याने चर्चेत राहिलेला, प्रभावशाली आणि अनेक वळणांनी भरलेला आहे. त्यांनी काका शरद पवार यांचे पुतणे म्हणून दाखल झाले मात्र काळानुसार त्यांनी स्वतःच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली.
त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार, तर दोन मुले पार्थ पवार आणि जय पवार असे आहे. सुनेत्रा पवार सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. 2024 मध्ये राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली. तर पार्थ पवार 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ते सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत. जय पवार हे उद्योग व कौटुंबिक व्यवसायात सक्रिय आहेत. सत्ता, संघर्ष आणि निर्णायक नेतृत्वामुळे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून कायम ओळखले जातील.