
'पश्चिम विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करा'; भारतीय किसान संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मूर्तिजापूर : वडगाव, कुरूम व माटोडा येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडगाव येथील किसन महाराज थांब्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदन दिले. पश्चिम विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच खरीप हंगामातील सर्व पिकांना सरसकट पीकविमा नुकसानभरपाई लागू करावी, यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
मुख्यमंत्री हे वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना गुरुवारी शेतकऱ्यांनी त्यांना थांबवून निवेदन दिले. अकोला वर्षापासून नैसर्गिक आपत्ती, अनियमित जिल्ह्यातील शेतकरी मागील काही पाऊस, अतिवृष्टी, पावसातील खंड, पिकांचे नुकसान तसेच बोगस बियाण्यांसारख्या समस्यांना सामोरे जात आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पश्चिम विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.
तसेच खरीप हंगामातील सर्व पिकांना सरसकट पीकविमा नुकसानभरपाई लागू करावी आणि बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच २०२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पश्चिम विदर्भातील सर्व महसूल मंडळांना सर्व पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील
निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. ‘काळजी करू नका, तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, असे सांगत त्यांनी राहुल राठी यांच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवला.
दुष्काळावर काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असताना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची घोषणा केली आहे. दुष्काळ संहितेच्या ट्रिगर-1 अंतर्गत देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.