दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; उद्याच निघणार मदतीचा आदेश
राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असताना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची घोषणा केली आहे. दुष्काळ संहितेच्या ट्रिगर-1 अंतर्गत देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांना दुष्काळाची झळ पोहोचली असून पिकं संकटात आली आहेत. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाशिममधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर अमरावती विमानतळावर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची वाट पाहिली जाणार नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्यात येईल. त्याचवेळी केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी आवश्यक पंचनामे आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव पाठवला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
सर्वदूर पिकांची परिस्थिती जवळपास सारखीच असल्याने राज्य सरकारने मदतीचं धोरण आखलं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन केलं जाणार आहे.
दुष्काळामुळे पुढील काळात चाराटंचाई आणि पाणीटंचाईचा प्रश्न आणखी गंभीर होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही समस्यांवर उपाययोजना करण्यासोबतच गरज पडल्यास अन्नधान्याचीही मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी थेट मदत करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
रब्बी हंगामात ज्या भागात उपलब्ध पाण्यावर पिकं घेता येतील, त्या ठिकाणी पाहणी करून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. रोजगारासाठी जलसंधारणाच्या कामांवरही भर देण्यात येणार आहे. आटलेल्या जलसाठ्यांमधील गाळ काढणे, जलसाठ्यांशी संबंधित संरचनांची दुरुस्ती आणि आवश्यक ठिकाणी नवीन कामं करण्याचं नियोजन केलं जाणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने कर्जमाफी केली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार नवीन कर्ज देणं बँकांना बंधनकारक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच शेतमालाची शासकीय दराने खरेदी करण्यासाठी लवकरच नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.






