
अनियमित पावसाने शेतीचे बिघडले गणित; खरिपाची पेरणी लांबली; कपाशी, सोयाबीनवर किडींचे आक्रमण
अकोला : सुरुवातीला पावसाने दिलेली ओढ आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने पेरण्यांनाही विलंब झाला. अकोला जिल्ह्यात काही भागात अद्यापही पेरणीची कामे सुरू होती, तर सुरुवातीला पेरणी झालेल्या पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली आहे. काही भागात रोगराईनेही डोके वर काढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
यंदाच्या मान्सूनने सुरुवातीपासूनच जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने खरीप हंगामावर संकटाचे सावट निर्माण झाले होते. जूनपासून ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाची मोठी तूट नोंदविण्यात आली. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंता काहीशी कमी झाली आहे. कमी पावसाचा थेट परिणाम कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह इतर खरीप पिकांवर झाला आहे. मध्यंतरी पावसाचा दीर्घ खंड, ढगाळ वातावरण आणि जमिनीत ओलाव्याचा अभाव यामुळे अनेक भागातील पिकांची वाढ खुंटली होती. काही ठिकाणी पिके सुकण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले.
कोकणची ‘जीवनवाहिनी’ बनली ‘मरणवाहिनी’ ! हजारो कोटींचा Mumbai -Goa महामार्ग आहे की अपघातांचा सापळा?
सध्या झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असला, तरी पुन्हा पावसात खंड पडल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषतः अकोला, बार्शिटाकळी, बाळापूर, पातूर आणि मूर्तिजापूर तालुक्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या
अकोला जिल्ह्यात मान्सून उशिरा सक्रिय झाल्यामुळे आणि पावसात खंड पडल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार मूग व उडिदाची पेरणी करण्याची योग्य वेळ निघून गेली असून, आता उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात मोठी घट किंवा पीक हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पिकांची खबरदारी घ्यावी.
– डॉ. तुषार जाधव, कृषी विकास अधिकारी अकोला.
यंदा पावसाने सातत्याने शेतकऱ्यांची परीक्षा घेतली. जिल्ह्यात पावसाच्या मोठ्या तुटीने यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अशात शेती कामांसाठी मजूर देखील मिळणे कठीण झाले आहे.
– हरिभाऊ कोगदे, शेतकरी
हवामान विभागाने आगामी काळात काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली. हवामान विभागाने आगामी काळात काही भागात मध्यम पावसाची आवश्यकता आहे.
– गजानन खराटे, शेतकरी, चांदूर