अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश
अकोला : यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ६५ गावांमधील १ हजार ८४३ शेतकऱ्यांच्या १ हजार ३८.१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यानंतर जिल्हा प्रशासनाने ७ ऑगस्ट रोजी २ कोटी ११ लाख १७ हजार रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून, कापूस, सोयाबीन, तूर या शेतीपिकांसह संत्री, केळी आणि पपई या फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतीपिकांच्या नुकसानीपोटी तेल्हारा तालुक्यातील २४० शेतकऱ्यांच्या १६० हेक्टर क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांसाठी १३ लाख ६ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. फळपिकांच्या नुकसानीमध्ये अकोट तालुक्यातील २५ गावांतील ३५९ शेतकऱ्यांच्या संत्रा आणि केळी पिकांचे नुकसान झाले आहे. तेल्हारा तालुक्यातील २२ गावांतील १ हजार १४६ शेतकऱ्यांच्या ५०७.८५ हेक्टर केळी आणि ५४.५ हेक्टर पपई पिकांचे नुकसान झाले.
याशिवाय, बाळापूर तालुक्यातील २ गावांतील सात शेतकऱ्यांचे ४.७५ हेक्टर, पातूर तालुक्यातील सात गावांतील ८८ शेतकऱ्यांचे ५१.३३ हेक्टर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावातील तीन शेतकऱ्यांचे १.२ हेक्टर केळी पिकाचे नुकसान झाले आहे. या सर्व फळपिकांच्या नुकसानीपोटी १ कोटी ९७ लाख ५७ हजार रुपयांची मदत मंजूर झाली आहे.
ओटीपीद्वारे प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक
मंजूर मदत मिळण्यासाठी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक (अंगठ्याचा ठसा) किंवा आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या ओटीपीद्वारे प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर मदतीची रक्कम डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
मदत निधीतून कर्जवसुली करता येणार नाही
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारा मदतीचा निधी बँकांनी कोणत्याही जुन्या कर्ज खात्यात किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी वसुलीसाठी वळता करू नये, असे शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत. मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर त्यातून कर्जवसुली करू नये, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित बँकांना तातडीने आवश्यक सूचना द्याव्यात, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
Farmers Crisis : पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी






