
अकोल्यातील नागरिकांवर मोठं जलसंकट; काटेपूर्णात 5 वर्षांच्या तुलनेत निम्म्याहून कमी साठा
अकोला : पावसाळ्याचा अर्धा हंगाम उलटूनही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत यंदा प्रकल्पात निम्म्याहून कमी जलसाठा जमा झाला असून, त्यामुळे अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या वर्षी ५०.८० टक्के असलेला जलसाठा यंदा २५.१४ टक्क्यांवर आला आहे.
एका आकडेवारीनुसार, काटेपूर्णा प्रकल्पात २०२१ मध्ये ६५.२०, २०२२ मध्ये ६९.८०, २०२३ मध्ये ५४.९३, २०२४ मध्ये ७२.७७ आणि २०२५ मध्ये ४३.८६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र केवळ २१.७१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला आहे. ८६.३३ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहरासह मूर्तिजापूर, अकोला एमआयडीसी आणि बोरगाव मंजू परिसराला पाणीपुरवठा केला जातो. यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अनियमित राहिल्याचा परिणाम जलप्रकल्पांवर दिसून येत आहे.
येत्या काळात काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही, तर अकोला शहरासमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
मध्यम प्रकल्पांमध्येही घट
जिल्ह्यातील मोर्णा, निर्गुणा आणि उमा या मध्यम प्रकल्पांची स्थितीही चिंताजनक आहे. या प्रकल्पांमध्ये गेल्या पाच वर्षांची सरासरी ८४.३९ दलघमी असताना यंदा केवळ ६०.०३ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. मोर्णा प्रकल्पातील जलसाठा गेल्या वर्षीच्या ७१ टक्क्यांवरून यंदा ६२.९८ टक्क्यांवर आला आहे. निर्गुणा प्रकल्पात सरासरी २८.५९ दलघमीच्या तुलनेत केवळ १३.६७ दलघमी साठा आहे. तर उमा प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला आहे.
वान प्रकल्पाची स्थिती समाधानकारक
जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांच्या तुलनेत तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाची स्थिती समाधानकारक आहे. या प्रकल्पात सरासरी ४८.०५ दलघमीच्या तुलनेत ६२.०१ दलघमी म्हणजेच ७५.७६ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षीच्या ५५.१९ टक्क्यांच्या तुलनेत यंदा वान प्रकल्पातील साठा अधिक आहे. याशिवाय पातूर पातूर तालुक्यातील तुळशीपूर व वानू लघुप्रकल्प, बाळापूर तालुक्यातील पारस बॅरेज, अकोट तालुक्यातील वाडेगाव बॅरेज तसेच पिंजर येथील ढोरे साठवण तलाव, दगडपारवा, खापरखेड, आपातापा, सिरसो, चिंचखेड, वडाळी आणि पिंपरी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.