पालखी मार्ग, तळांवरील सर्व कामे 25 जूनपर्यंत पूर्ण होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या 'या' महत्त्वपूर्ण सूचना
पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पायी चालत येतात. सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा व पालखी तळांवर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची सर्व कामे संबधित विभागाने समन्वय साधून 25 जूनपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिल्या.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने केबीपी कॉलेज, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी आधिकारी कुलदिप जंगम, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पागांरकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, भीमा पाटबंधारे कार्यकारी अभियंता हरसुरे, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे घोडके यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावर वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी व पालखी सोहळ्याच्या वाहतूक मार्गात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन व संबधित विभागाने सूचविलेले कामे तात्काळ करुन घ्यावीत. त्याचबरोबर आवश्यक ठिकाणी पालखी सोहळ्यास पालखी तळाकडे जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य प्रमाणात उतार करावा.
तसेच भीमा पाटबंधारे विभागाने चंद्रभागा नदीपात्रात पाणीपातळी बाबतचे माहितीफलक लावावेत. उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरणाची पाणी पातळी दिवसेदिवस वाढत आहे. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी संबधित विभागाशी चर्चा करुन योग्य नियोजन करण्यात येईल. तसेच वीर धरणतील पाणी सोडण्याबाबतही चर्चा करण्यात करुन चंद्रभागा नदी पात्रात योग्य प्रमाणात पाणी पातळी राहिल याबाबत नियोजन करण्यात येईल.
याशिवाय, पालखी मार्गावर, तळांवर भाविकांसाठी मुबलक प्रमाणात शौचालयाची उपलब्धता करण्यात येणार असून, शौचालयाची वेळोवळी स्वच्छता करण्यासाठी सक्शेन मशीन व जेटींग मशीनच्या वाहनांना जाण्यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतुक नियोजन करावे. बीएसएनएल विभागाने पालखी मार्ग, तळ तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तात्काळ नियोजन करावे.
यावेळी बैठकीत पालखी मार्ग, तळ तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी वारकरी भाविकांना सुविधा उपलब्धतेसाठी सर्व संबधित विभागाच्या अडचणी जाणून घेवून ज्या विभागाची मदत लागणार त्यांना तात्काळ जिल्हाधिकारी कुमार आशर्वाद, मुख्य कार्यकारी आधिकारी कुलदिप जंगम, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी आवश्यक सूचना दिल्या.