महाराष्ट्रातील टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. (फोटो - सोशल मीडिया)
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत यांनी टीपू सुलतानवरुन भाजपने राज्याचे वातावरण खराब करु नये असा इशारा देखील दिला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “राज्यात वाद निर्माण करणाऱ्या भाजपला कामधंदे नाही. जनतेचे, कष्टकरी लोकांचे, विद्यार्थ्यांचे, नोकरदारांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र यावर कधीही भाजपने आंदोलन केलेले नाही. परवा मुंबईत मेट्रोचा पूल कोसळून लोक मरण पावली हे त्यांचेच पाप आहे. ट्रम्पने देशाला गुलाम केले. त्यावर भाजपने कधी प्रश्न विचारलेत का, पण जिथे हिंदू मुसलमानांच्या संदर्भात ठिणगी टाकता येईल,” असे प्रश्न निर्माण करायचे आणि लोकांना भ्रमिष्ट करायचे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
हे देखील वाचा : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक
हे प्रकरण मालेगाव माहपालिकेमध्ये टीपू सुलतानचा फोटो लावण्यावरुन सुरु झाले होते. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, “मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानाचा फोटो लावलाय, लोकांना आक्षेप घेतल्यानंतर तो फोटो काढण्यात आला. हा विषय तिथेच संपवायला हरकत नव्हती. पण भाजपने याविरोधात महाराष्ट्रभर आंदोलन केले. या आंदोलनाची गरज नव्हती. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हे सांगायला भाजपची गरज नाही. इतिहासात काही गोष्टींची नोंद आहे आणि ती नोंद भाजपलाही बदलता येणार नाही. मुळात टिपू सुलतान विषयी भाजप आता ज्या भूमिका मांडतंय, त्यांनी इतिहासात आपण काय भूमिका घेतल्या होत्या, त्याचा रेकॉर्ड तपासावा,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : कॉंग्रेस अध्यक्षांची छत्रपती शिवाजी महाराजांची टीपू सुलतानसोबत तुलना; नितेश राणेंनी दिला कडक इशारा
टिपू प्रकरणी आ बैल मुझे मार
पुढे खासदार संजय राऊत यांनी रामनाथ कोविंद यांनी केलेल्या टीपू सुलतानच्या गौरवाचे उदाहरण दिले. खासदार राऊत म्हणाले की, “कर्नाटकमध्ये विधानसभेत भाजपने नेमलेले रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानीचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केला आहे. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती असताना ते कर्नाटकात गेले, त्यांनी टिपू सुलतान विषयी गौरवाची फुलं उधळली होती. तेव्हा तुम्ही का रोखलं नाही. अनेक महापालिकेत भाजपची सत्ता असताना टिपूच्या नावाने अनेक प्रकल्प सुरु केले. मुंबईंच्या महापौर रितू तावडे, अमित साटम यांचं याला समर्थन आहे. त्यामुळे भाजपने टिपू प्रकरणी आ बैल मुझे मार करु नये. पुढच्या दोन ते तीन वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत. कशाला उगाचच तोंडाला फेस काढताय. महाराष्ट्र बदनाम करु नका. ज्या गोष्टी इतिहासात आहेत, त्याची नोंद आहे, त्या तशाच राहतील,” असेही स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.






