अटक केलेल्यांना सोडून द्या, नाहीतर...; अंबादास दानवेंचा सरकारला इशारा
सासवड : जमीन अधिग्रहण कायद्यात ज्या जमिनीचा उपयोग नाही, नापीक आहे अशी जमीन घेतली जाते. यामध्ये केवळ १० टक्के नापीक आणि ८५ टक्के जमीन बागाईत असताना शेतकऱ्यांची परवानगी न घेता जबरदस्तीने जमीन बळकावत आहात. तुमच्यासाठी जमीन धंदा असेल पण आमच्यासाठी आई आहे. आमच्या जमिनी संपादन करायला तुमच्या बापाची आहे का ? असा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून येऊन औरंजेबाची भूमिका करताल तर आम्हाला संभाजी महाराज व्हावे लागेल, असा खणखणीत इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला आहे.
पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित कुंभारवळण गावच्या अंजना कामथे यांचे विमानतळाच्या प्रश्नावरुन धक्क्याने शनिवारी निधन झाले. त्यानंतर पोलीस आणि शेतकरी यांच्यात मोठ्या प्रमाणात धुमश्चक्री झाली. पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले, तर अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. सरकारला विमानतळ जागेचा सर्व्हे स्थगित करावा लागला. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुंभारवळण येथे त्यांच्या घरी जाऊन कामथे कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सरकारवर तुफान हल्लाबोल केला.
याप्रसंगी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, तालुका प्रमुख अभिजीत जगताप, नीरा बाजार समितीचे माजी उपसभापती महादेव टिळेकर, निवृत्त शिक्षण अधिकारी पांडुरंग मेमाणे, देविदास कामथे, दत्तात्रय झुरंगे, कुंभारवळण गावच्या सरपंच मंजुषा गायकवाड यांच्यासह वनपुरी पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी या गावांचे सरपंच त्याचप्रमाणे विमानतळ प्रकल्प बाधित गावांचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अंबादास दानवे यांनी कोणत्याही नोटीस न देता आमच्या शेतात कशाला येता ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. भावनिक लढा लढू नका, तर कायद्याची लढाई लढा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेला लाठीहल्ला आणि कारवाई वरून बोलताना तुमच्यासाठी कायदा असेल तर आमच्यासाठी सुद्धा आहे. तुम्ही गुन्हे दाखल करणार असाल तर आम्ही सुद्धा गुन्हे दाखल करू शकतो. आमचा लढा तुमच्याशी नाही, सरकार बाजूला राहील, विमानतळ बाजूला राहील आणि तुमचा जीव जाईल. अटक केलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब सोडून द्या नाही तर पोलिस स्टेशनला यावे लागेल, असा इशारा दिला.
शेतकऱ्यांनी पोलिसांवर बैलगाडी सोडली म्हणून शेतकऱ्यावर लाठीहल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. यावर बोलताना आता फक्त बैलजोडी सोडली आहे त्याला अजून काही सांगितले नाही, त्याला सांगितल्यावर तो काय करतो हे तुम्हाला चांगले माहिती आहे. अशा शब्दात टीका करून तुम्ही कारवाई करणार असेल तर आम्हाला वेगळ्या दिशेने जावे लागेल, असा इशारा अंबादास दानवे यांनी पोलिसांना दिला आहे. पुरंदरला विमानतळाची गरज नाही. तुम्हाला विमानतळ करायचे असेल तर बारामतीच्या विमानतळाचे विस्तारीकरण करा अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.